
आंबेत पुलावरील अवजड वाहतूक कधी सुरू होणार?___
बार्जच्या धडकेला महिना उलटला; स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होऊनही प्रशासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा
मंडणगड : आंबेत पुलाला बार्जची धडक बसून महिना उलटला तरी पुलावरील अवजड वाहतूक अद्याप बंदच असल्याने वाहनधारक आणि प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे. पुलाचे रोबोटिक स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाल्याची माहिती असतानाही अवजड वाहतूक पूर्ववत का करण्यात आलेली नाही, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. पुलाच्या सद्यस्थितीबाबत प्रशासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट करून अवजड वाहतूक सुरू करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
६ जुलै रोजी बार्जची धडक बसल्यानंतर पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली होती. त्यानंतर तपासणी करून हलकी वाहतूक सुरू करण्यात आली; मात्र अवजड वाहनांना अद्यापही पुलावरून प्रवेश देण्यात आलेला नाही. दरम्यान, पुलाचे रोबोटिक स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऑडिटचा अहवाल नेमका काय आहे आणि त्यानुसार कोणती कार्यवाही करण्यात आली, याबाबत प्रशासनाने स्पष्टता देण्याची मागणी होत आहे.
एसटी फेऱ्यांवरही परिणाम
अवजड वाहतूक बंद असल्याचा फटका एसटी वाहतुकीलाही बसला आहे. दापोलीकडून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक एसटी फेऱ्या खेडमार्गे वळवण्यात आल्या आहेत. काही फेऱ्या मंडणगड–म्हाप्रळ–चिंबावे–महाड मार्गे सुरू ठेवण्यात आल्या आहेत. तसेच मंडणगडहून मुंबई आणि पुण्याकडे जाणारी वाहतूकही म्हाप्रळ–महाड मार्गे वळवण्यात आली आहे.
पर्यायी मार्गामुळे प्रवासाचे अंतर वाढले असून प्रवासासाठी लागणारा वेळही वाढला आहे. परिणामी प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेषतः नियमित प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिक यांना या वाहतूक व्यवस्थेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मालवाहतूकदारांचेही नुकसान
अवजड वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असल्याने मालवाहतूकदारांनाही मोठा आर्थिक फटका बसत आहे. अतिरिक्त इंधन खर्च, वाढलेले अंतर आणि वेळ यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे पुलाची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती तांत्रिक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी आणि परिस्थिती सुरक्षित असल्यास अवजड वाहतूक पूर्ववत करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाले असल्याची माहिती असताना निर्णय रखडला का? पुलावर अवजड वाहतूक सुरू करण्यासाठी आणखी कोणत्या अहवालाची किंवा परवानगीची प्रतीक्षा आहे? असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाने याबाबत मौन न बाळगता पुलाच्या सद्यस्थितीची आणि अवजड वाहतूक बंद ठेवण्यामागील कारणांची अधिकृत माहिती जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.




