
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ चिपळूणकर रस्त्यावर; हजारो नागरिकांचा विराट मोर्चा
चिपळूण, : लडाखचे पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ चिपळूण शहरात रविवारी हजारो नागरिकांनी विराट मोर्चा काढत आपला पाठिंबा जाहीर केला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने शहरात जनआंदोलनाचे चित्र पाहायला मिळाले.
मोर्चादरम्यान सहभागी नागरिकांनी काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात विद्यार्थ्यांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पर्यावरण संरक्षण, लोकशाही मूल्ये आणि जनआवाजाच्या समर्थनार्थ आपली भूमिका मांडली.
यावेळी शहरात सह्यांची विशेष मोहीमही राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सह्या केल्या. मोर्चाची सांगता तहसील कार्यालयात निवेदन सादर करून करण्यात आली.
आंदोलन शांततेत पार पडले असून, पर्यावरण संरक्षण आणि लोकशाही हक्कांच्या समर्थनार्थ चिपळूणकरांनी एकजूट दाखवल्याची भावना सहभागी नागरिकांनी व्यक्त केली.




