
आंबा घाटात दरड कोसळली; रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वाहतूक सावधगिरीने सुरू
मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील दख्खन ते कळकदारा दरम्यान आज (शुक्रवारी) सकाळी सुमारे ९ ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान मोठी दरड कोसळली. या घटनेनंतर दख्खन ते कळकदारा या दिशेचा एकेरी मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
कोसळलेली दरड सध्या सुरू असलेल्या वाहतूक मार्गाच्या अत्यंत जवळ येऊन थांबली आहे. सुदैवाने चारपदरी महामार्गाच्या मधोमध उभारण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक कठड्यामुळे दरड थेट वाहतुकीच्या मार्गावर आली नाही. मात्र काही मोठे दगड आणि दगडांचे तुकडे रस्त्यावर आल्याने वाहनचालकांसाठी धोका निर्माण झाला आहे.
सध्या संबंधित यंत्रणेकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून परिसरात खबरदारीचे उपाय सुरू आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने आंबा घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून अत्यंत सावधगिरीने वाहने चालवावीत, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




