विरोधकांनी महिला पंतप्रधानपदाचा चेहरा द्यावा; देशात परिवर्तन घडेल : भास्कर जाधव

चिपळूण : विरोधकांनी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी महिला चेहरा पुढे केल्यास देशात मोठे राजकीय परिवर्तन घडू शकते, असे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. असे घडल्यास देशात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

चिपळूण येथे पत्रकारांशी संवाद साधताना जाधव यांनी केंद्रातील मोदी सरकार, राज्य सरकार, खत टंचाई, विधानपरिषद निवडणूक तसेच पक्षप्रवेशाच्या चर्चांवर जोरदार टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ताकाळाविषयी बोलताना जाधव म्हणाले की, केवळ पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी तुलना करून मोठेपणा सिद्ध होत नाही. एखादी व्यक्ती किती वर्षे सत्तेत राहिली यापेक्षा त्या काळात काय काम केले, हे अधिक महत्त्वाचे असते. यावेळी त्यांनी राजेश खन्ना यांच्या “बाबूमोशाय, जिंदगी लंबी नहीं, बड़ी होनी चाहिए” या प्रसिद्ध संवादाचा उल्लेख करत मोदींवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच १२ वर्षांचा विकासाचा लेखाजोखा मांडला. मात्र, विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ किती नागरिकांना झाला, याची आकडेवारी सरकारने जाहीर केलेली नाही, असा आरोप जाधव यांनी केला. सरकारकडे घोषणांचा पाऊस असला तरी त्यांचे ठोस परिणाम जनतेसमोर मांडले गेलेले नाहीत, असे ते म्हणाले.

राज्यातील खत टंचाईच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सध्या शेतकऱ्यांना खतासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. रेशन, डिझेल, पेट्रोल तसेच नोकऱ्यांसाठीही नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सांगत, हेच देशातील वास्तव चित्र असल्याची टीका त्यांनी केली.

विधानपरिषद निवडणुकीच्या संदर्भात बोलताना जाधव यांनी भाजपवर आरोप करताना सांगितले की, ज्या जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने उमेदवार दिले, तेथे भाजपने बंडखोर उमेदवार उभे केले. ही भाजपची जुनी राजकीय कार्यपद्धती असल्याचा दावा त्यांनी केला.

जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनाबाबत अभिजीत दीपके यांच्या प्रश्नावर उत्तर देताना, त्या आंदोलनाला अपेक्षित प्रसिद्धी मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ‘गोदी मीडिया’मुळे अशा आंदोलनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर करताना जाधव म्हणाले की, हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हितासाठी असून त्याला शंभर टक्के पाठिंबा आहे.

दरम्यान, आपल्या कथित पक्षप्रवेशाच्या चर्चांवर संताप व्यक्त करताना जाधव म्हणाले की, माझ्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा करणारे लोक मूर्ख आहेत. माझ्याविषयी अशा प्रकारच्या चर्चा करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? मी पक्ष सोडणार असल्याच्या अफवांना पूर्णविराम द्यावा, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button