रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; महामार्ग कामांवर परिणाम!

रत्नागिरी : उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने रत्नागिरी जिल्ह्यात दमदार हजेरी लावत सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाचा जोर कायम राहिला आहे. मंगळवारी सकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले. दुसरीकडे, धरणांतील जलसाठ्यात वाढ होऊन पाणीटंचाई दूर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

रत्नागिरी शहरातील खालचा फगरवठार परिसरातील पाटणकर आणि दीक्षित यांच्या घरांच्या अंगणात पाणी, माती व चिखल वाहून आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

मुंबई-गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामांमुळे पावसाचे पाणी थेट घरांकडे वळल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. सखल भागातील काही घरे धोक्याच्या छायेत आली असून चिखल घरांमध्ये घुसण्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, लांजा-साटवली मार्गावरील पालयेवाडी येथे मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास भलेमोठे आकेशियाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. एसटी बस, रिक्षा तसेच अन्य चारचाकी वाहने रस्त्यात अडकून पडली. शालेय विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला.

सिंधुदुर्गात पावसाचे पुनरागमन; करपू लागलेल्या भात पिकांना नवसंजीवनी, बळीराजाला मोठा दिलासा

मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या सुरू असलेल्या कामांनाही अडथळे निर्माण झाले आहेत. महामार्गावरील काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. संगमेश्वर, पाली, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यातील काही भागांमध्ये अर्धवट कामांमुळे रस्त्यांवर चिखल साचल्याचे चित्र दिसून आले. वाहनचालकांना या मार्गांवरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

मात्र, या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उकाड्यापासून नागरिकांना आराम मिळाला असून शेतकरी वर्गासाठीही हा पाऊस वरदान ठरला आहे. दुबार पेरणीचे संकट टळण्यास मदत झाली असून शेतीच्या कामांना आता वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

अर्जुना प्रकल्प परिसरात सर्वाधिक १६७ मिमी पाऊस

जलसंपदा विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाने सकाळी आठ वाजता प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यातील धरणांमध्ये जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गडनदी मध्यम प्रकल्पात सर्वाधिक ५७.०८ टक्के जलसाठा नोंदविण्यात आला असून अर्जुना प्रकल्प परिसरात १६७ मिमी इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

नातुवाडी प्रकल्पात २६.११ टक्के, अर्जुना प्रकल्पात ४३.५६ टक्के तर मुचकुंडी प्रकल्पात २९.८६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. कोणत्याही धरणातून सध्या सांडवा विसर्ग सुरू नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नद्यांची पातळी नियंत्रणात

जगबुडी, वशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंडी आणि बावनदी या प्रमुख नद्यांच्या पाणीपातळ्या वाढल्या असल्या तरी त्या अद्याप सतर्कता पातळीखाली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तत्काळ पूरस्थितीचा धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक ९१ मिमी पाऊस

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक ९१ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल गुहागरमध्ये ७६ मिमी, राजापूरमध्ये ४६.६३ मिमी, दापोलीमध्ये ४५ मिमी आणि खेडमध्ये ४१.७१ मिमी पाऊस झाला. जिल्ह्याचे एकूण पर्जन्यमान ४१९.९५ मिमी तर सरासरी पर्जन्यमान ४६.६६ मिमी नोंदविण्यात आले.

जिल्ह्यात मान्सूनने जोरदार सुरुवात केल्याने एकीकडे नागरिकांच्या अडचणी वाढल्या असल्या, तरी जलसाठा, शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने हा पाऊस दिलासादायक ठरत असल्याचे चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button