रत्नागिरी जिल्ह्यातील पाच प्रमुख पोस्ट कार्यालयांमध्ये गेली सात वर्षे सुरू असलेली रेल्वे तिकीट बुकिंग सेवा अखेर बंद


रत्नागिरी जिल्ह्यातील पाच प्रमुख पोस्ट कार्यालयांमध्ये गेली सात वर्षे सुरू असलेली रेल्वे तिकीट बुकिंग सेवा अखेर बंद करण्यात आली असून, यामुळे ग्रामीण भागातील हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक त्रुटी आणि उदासीन भूमिकेमुळे ही सुविधा बंद झाल्याचा आरोप होत असून, सेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
रत्नागिरी मुख्य पोस्ट कार्यालयासह लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि खेड येथील पोस्ट कार्यालयांमध्ये २०१८ पासून रेल्वे तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध होती. या सेवेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी सहज रेल्वे तिकीट मिळत असल्याने मोठा दिलासा मिळाला होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, ऑनलाईन व्यवहारात अडचण येणारे नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रवासी या सुविधेचा मोठ्याप्रमाणावर लाभ घेत होते. या सेवेसाठी रेल्वे प्रशासनाने संगणक, नेटवर्क सुविधा आणि तिकीट प्रिंटर उपलब्ध करून दिले होते, तर पोस्ट विभागाने जागा आणि कर्मचारी उपलब्ध करून दिले होते. मात्र, रेल्वेचा सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने तिकीट बुकिंगमध्ये सतत अडथळे निर्माण होत होते. अनेकदा तासनतास बुकिंग सेवा ठप्प राहात होती. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या; मात्र यांत्रिक अडचणी दूर करण्याऐवजी बुकिंगचे प्रमाण कमी होत आहे हे कारण देत सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही जनहिताची सेवा कायम ठेवावी, यासाठी पोस्ट विभागाच्या मुंबई कार्यालयाने दिल्ली यथील रेल्वे मंत्रालयाकडे पत्राद्वारे विनंती केली होती. तरीही रेल्वे प्रशासनाने कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नसल्याने अखेर ही सुविधा बंद करण्यात आली. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आता रेल्वे तिकीट काढण्यासाठी थेट रेल्वे स्थानकावर जावे लागत आहे. ऑनलाईन बुकिंगमध्ये येणार्‍या अडचणी, एजंटांकडून होणारी संभाव्य फसवणूक आणि अतिरिक्त खर्च यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या अडचणीत भर पडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button