
देवरुख आगारात दाखल झालेल्या पाच नवीन बसेसचे उत्साहात स्वागत
संगमेश्वर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने प्रवाशांच्या सोयीसाठी टप्प्याटप्प्याने ८३०० नवीन बसेस घेण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. यात पहिल्या टप्प्यात देवरुख आगरासाठी पाच बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. देवरुख आगारासाठी जास्तीत जास्त नवीन बसेस मिळाव्यात यासाठी अनेक एसटी प्रेमी नागरिकांनी प्रयत्न केला. सह्यांची मोहीम राबवून लोकचळवळ उभी केली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांची नागरिकांसह भेट घेऊन देवरुखसाठी जास्तीत जास्त बस मिळाव्यात अशी आग्रही मागणी केली. पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे तर आमदार शेखर निकम यांनी देवरुख नगर पंचायत कार्यालय येथे यासाठी खास बैठक घेत देवरुख साठी जास्तीत जास्त बसेस मिळाव्यात यासाठी थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना फोन केला. या सगळ्याचा परिणाम स्वरूप देवरुख साठी पहिल्या टप्प्यात पाच बसेस उपलब्ध झाल्या.



