
कर्जमाफी योजना फसवी? विरोधक आणि शेतकरी संघटनांचे आरोप काय?
राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर विरोधक आणि शेतकरी संघटनांनी तीव्र टीका केली आहे. त्यांच्या मते, कर्जमाफीसाठी घालण्यात आलेल्या जाचक अटींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीऐवजी केवळ ५० हजार रुपयांचा लाभ मिळणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेने ही योजना शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे म्हटले आहे. सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, भाजपने या आरोपांचे खंडन करत महायुती सरकारने निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केले असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा दावा केला आहे.




