संगमेश्वर येथे अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना


रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून तिच्यावर अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी २२ वर्षीय संशयित आरोपी पती विरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी अवघ्या १७ वर्षे १६ दिवसांची असून ती १६ आठवड्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासणीत (MLC) स्पष्ट झाले आहे. पीडित मुलगी आणि संशयित आरोपी रोहित अशोक भुटिया (वय २२, मूळ रा. दिवळिया, जि. सुरेंद्रनगर, गुजरात, सध्या रा. रत्नागिरी) हे एकाच समाजातील आहेत. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही संशयित आरोपीने तिच्या संमतीविना वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.
​भीतीपोटी आधी पोलिसांना दिली खोटी माहितीसदर पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला. यापूर्वी दिनांक १३ मे २०२६ रोजी गुजरात राज्यातील लकतर पोलीस ठाणे येथे या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झाली होती. मात्र, कारवाईच्या भीतीपोटी पीडितेने तिचे लग्न आणि शारीरिक संबंध गुजरात मध्येच झाल्याचा खोटा जबाब दिला होता. परंतु, तिच्या भावाने आणि मावशीने समजूत काढल्यानंतर तिने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात खरा प्रकार सांगितला
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात ‘झिरो’ क्रमांकाने गुन्हा नोंदवून तो पुढील तपासासाठी संगमेश्वर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button