नैरोबीत भरणार साहित्याचा महाकुंभ; ‘कोमसाप’च्या पुढाकाराने १ व २ मे रोजी रंगणार ‘हृदयंगम’ संमेलन!



रत्नागिरी:
मराठी मातीचा सुगंध आता सातासमुद्रापार पूर्व आफ्रिकेतील केनियामध्ये दरवळणार आहे. महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), विभव इंटरनॅशनल आणि महाराष्ट्र मंडळ, नैरोबी यांच्या संयुक्त विद्यमाने १ आणि २ मे २०२६ रोजी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

​ ‘कोमसाप’च्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांच्या नेतृत्वाखाली या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. “हे संमेलन म्हणजे जागतिक स्तरावर मराठी संस्कृतीचे बीजारोपण आहे,” अशा शब्दांत केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी आपला उत्साह व्यक्त केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नैरोबीतील ‘महाराष्ट्र मंडळाने’ या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली असून, परदेशातील मराठी बांधवांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

​नामवंत साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील ६० हून अधिक मान्यवर साहित्यिकांचा जत्था नैरोबीला रवाना होत आहे. यात प्रामुख्याने कवी अशोक नायगावकर, कवी अरुण म्हात्रे, विचारवंत पांढरपट्टे, संगीतकार कौशल इनामदार, लेखक अभिजीत जोशी यांसारख्या दिग्गज कलावंतांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अधिकारी, कार्याध्यक्ष प्रदिप ढवळ, विश्वस्थ अनुप कर्णिक आणि ‘कोमसाप’चे पदाधिकारी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत.

​’कोमसाप’चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. मात्र, नमिता कीर यांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल, असा विश्वास त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून व्यक्त केला आहे.

​नैरोबीतील ‘महाराष्ट्र मंडळ’ हे गेल्या अनेक दशकांपासून मराठी संस्कृती जपण्याचे काम करत आहे. या संमेलनाच्या निमित्ताने वैचारिक परिसंवाद, भव्य कविसंमेलन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. मराठी अस्मितेचा हा ‘हृदयंगम’ जागर करण्यासाठी अवघी नैरोबी नगरी सज्ज झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button