
नाविन्यपूर्ण शेतीसाठी दयानंद चौगुले यांना ‘शेतकरी फेलो पुरस्कार २०२६’
राजापूर : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या संकल्पनेतून यावर्षीपासून नाविन्यपूर्ण आणि प्रयोगशील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘शेतकरी फेलो पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला. या पुरस्कारासाठी विद्यापीठाच्या निवड समितीने रत्नागिरी जिल्ह्यातून प्रगतशील शेतकरी दयानंद चौगुले यांची निवड केली आहे.
दापोली येथील विद्यापीठाच्या वीरशैव सभागृहात आयोजित कार्यक्रमात कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते दयानंद चौगुले यांना ‘शेतकरी फेलो पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. यावेळी विद्यापीठातील मान्यवर, अधिकारी तसेच कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर दयानंद चौगुले यांनी हा सन्मान मातीत राबणाऱ्या सर्व कष्टकरी शेतकरी बांधवांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली.
दयानंद चौगुले यांनी शेती क्षेत्रात केलेले प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच देशी वाणांचे संवर्धन यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी केवळ स्वतःच्या शेतीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. पंचक्रोशीतील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या शेतावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. आधुनिक शेती तंत्रज्ञान, देशी वाणांची माहिती आणि शेतीतील प्रगतीची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.
तसेच तालुक्यातील विविध शाळांमध्ये जाऊन शिक्षक व विद्यार्थ्यांना शेतीविषयक मार्गदर्शनही त्यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांनी त्यांची ‘शेतकरी फेलो पुरस्कार २०२६’साठी निवड केली असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.




