
थलपती विजय यांचा शपथविधी १० वाजता, राहुल गांधीसह मान्यवरांची उपस्थिती
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज सकाळी दिल्लीहून चेन्नईकडे रवाना झाले. थलपती विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.तमिळनाडूच्या राजकारणात मोठा राजकीय उलथापालथ घडवत विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला. VCK आणि IUML यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता विजय आज सकाळी १० वाजता तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. याबाबत राज्यपाल आर्लेकर यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. मात्र, विविध पक्षांचा पाठिंबा मिळाल्यानंतर TVK सरकार स्थापनेस सज्ज झाली आहे. विजय यांच्या पक्षाने राज्यातील १०८ जागांवर विजय मिळवला. बहुमतासाठी ११८ आमदारांची आवश्यकता होती. त्यानंतर काँग्रेसच्या ५, CPI च्या २, CPI-M च्या २, VCK च्या २ आणि IUML च्या २ आमदारांनी TVK ला पाठिंबा दिला. त्यामुळे विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला.
आज सकाळी चेन्नईतील नेहरू स्टेडियममध्ये विजय यांचा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सुरुवातीला दुपारी ३.४५ वाजता शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यांच्या ज्योतिषांनी सकाळी १० वाजताचा मुहूर्त सुचवल्यानंतर वेळेत बदल करण्यात आला.




