खासगी बस वाहतूकदारांवर कारवाई करा, प्रताप सरनाईक यांचे निर्देश!

मुंबई : सुट्टी काळ, सण उत्सव काळातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन खाजगी वाहतूकदार तिकिटांचे दर मनाला येईल तसे आकारतात. त्यांच्यावर कोणाचेही बंधन नाही. अक्षरश प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. त्यावर आता परिवहन विभाग निर्बंध घालणार आहे. मुंबई पुणे, मुंबई गोवा, मुंबई अहमदाबाद यांचे शासन ठरविलं त्याच दराने तिकीट द्यावी लागेल. उशिरा का होईना सरकारला हे तिकीट दर नियंत्रणात ठेवण्याचे सुचले आहे.

राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून सुट्टीकाळात बेकायदेशीर दरवाढ केली जाते. अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक फसवणूक बाबत शासन गंभीर आहे. या प्रवाशांच्या फसवणूकी विरोधात दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार आहेत. प्रवाशांना होणारा आर्थिक त्रास आणि इतर गैरसोयीचा अभ्यास करणारी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

स्थापन करण्यात येणारी समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण कशा प्रकारे मिळवण्याची गरज आहे. अवैध बुकिंग ॲप्सना कसा आळा घालता येईल. प्रवाशांच्या तक्रारींवर कशाप्रकारे प्रभावी उपाययोजना करता येतील, याचा सविस्तर अहवाल सादर करेल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील बैठकीत अवास्तव भाडेवाढीच्या विरोधात उपाययोजना जाहीर केल्या जातील. सध्या अनेक खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या अनधिकृत ॲप्सच्या माध्यमातून प्रवाशांचे बुकिंग करीत असल्याच्या तक्रारी आहेत. सण,उत्सव किंवा सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांकडून जास्त तिकीट दर आकारले जातात. प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या अशा प्रवासी बस वाहतूकदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची लूट होता कामा नये, असा इशारा सरनाईक यांनी दिला.

राज्यातील बसस्थानकांवरील संपर्क यंत्रणा अधिक सक्षम आणि प्रभावी करणे आवश्यक आहे. प्रत्येक बसस्थानकावर प्रवासी सुविधांसाठी संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्याच्या सूचना सरनाईक यांनी दिल्या. परिवहन विभागाने नावे बदललेल्या गावांबाबत तसेच व्याकरणदृष्ट्या अचूक मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक आहे. त्याचे एक परिपत्रक जारी करुन त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले.

राज्यातील एसटी बस आणि बसस्थानकांच्या अस्वच्छतेबाबत प्रवाशांकडून वारंवार तक्रारी येत आहेत. बसस्थानकांचा कायापालट करण्यासाठी आणि कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येत आहेत. १ जूनपासून महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे मोफत करण्यात येणार आहेत. प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर तसेच सुराज्य अभियान संघटनेचे अभिषेक मुरुकटे, अरविंद पानसरे, सुनील हनवट उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button