आंजर्ले-मुर्डीत रस्ते दुरुस्तीसाठी ८ मे रोजी जनआंदोलन प्रशासकीय दुर्लक्षामुळे ग्रामस्थ आक्रमक


दापोली : आंजर्ले आणि मुर्डी गावातील रस्त्यांची महावितरणच्या कामामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दाद देत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या शुक्रवारी (८ मे) सकाळी ९ वाजल्यापासून आंजर्ले खाडी पूल ते वाकडा आंबा परिसरात हे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
आंजर्ले आणि मुर्डी गावांमध्ये महावितरणमार्फत भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले होते. मात्र, हे काम झाल्यानंतर रस्त्यांची डागडुजी न केल्याने रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग (दापोली) आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे ग्रामस्थांनी अनेकदा लेखी तक्रारी केल्या, तसेच तोंडी पाठपुरावाही केला. मात्र, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे ग्रामस्थांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे. दररोजच्या प्रवासात होणारा त्रास आणि संभाव्य अपघात लक्षात घेता, ‘आता नाही तर कधीच नाही’ असा पवित्रा घेत ग्रामस्थांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, दापोली यांना देण्यात आले आहे.
“आम्ही वारंवार विनंती करूनही आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. जोपर्यंत रस्ते दुरुस्तीचे ठोस आश्वासन आणि काम सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी भावना अंजली आणि मुरली येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या आंदोलनात भास्कर जोशी, मंगेश महाडिक, शशी पेंडसे, भालचंद्र कोकणे, स्वानंद जोशी, श्रावण दांडेकर, व तसेच दोन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button