
देवरूख येथे कुर्हाडीचा घाव बसून वृद्धाचा मृत्यू
देवरूख येथे पायावर कुर्हाडीचा घाव बसून झालेल्या रक्तस्त्रावामुळे तुकाराम गंगाराम बाईत (६५ रा. हरपुडे-खालची घुगवाडी) यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
बाईत सोमवारी सकाळी स्वमालकीच्या गावठाण येथील जागेत काजूच्या झाडांना पुरण घालण्यासाठी गेले होते. काम करताना कुर्हाडीचा घाव अचानक पायावर आल्याने जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना तत्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात टाके घालून, बॅन्डेज करून झाल्यानंतर कुटुंबीय त्यांना घरी घेऊन गेले. मात्र जेवण करून झाल्यानंतर बाईत यांना अस्वस्थ वाटू लागले. पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय सूत्रांनी तपासणी करून बाईत यांना मृत घोषित केले. विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मंगळवारी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.




