
तिकीट तपासणी मोहिमेतून कोकण रेल्वेच्या तिजोरीत सर्वाधिक २७ कोटी ५९ लाखांचा महसूल
वर्षभरात १४०० जादा गाड्यांचे नियोजन
पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान
प्रवासी सुविधांमध्ये मोठी सुधारणा
कनेक्टिव्हिटी, सुरक्षा आणि शाश्वत विकास या त्रिसूत्रीवर भर
रत्नागिरी : पंतप्रधानांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला गती देत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने यंदाच्या आर्थिक वर्षात सर्वाधिक २७ कोटी ५९ लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वर्षभरात १४०० जादा गाड्या सोडल्या होत्या. तसेच कनेक्टिव्हिटी, सुरक्षा आणि शाश्वत विकास या त्रिसूत्रीवर भर देत कोकण रेल्वेने आर्थिक प्रगती केली आहे.
या यशाबद्दल बोलताना केआरसीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा म्हणाले की, “जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर आमचा भर असून, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण रेल्वे भारतीय रेल्वे जाळ्यातील एक महत्त्वपूर्ण दुवा म्हणून अधिक भक्कम होत आहे.”
कोकण रेल्वेने यावर्षी प्रवासी वाहतुकीत मोठी वाढ नोंदवली आहे. विशेष म्हणजे, तिकीट तपासणी मोहिमेतून रेल्वेच्या तिजोरीत आतापर्यंतचा सर्वाधिक २७.५९ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वर्षभरात एकूण १,४०० विशेष गाड्या चालवण्यात आल्या. यात ३७६ गणपती विशेष, १८५ उन्हाळी विशेष आणि ८६ हिवाळी विशेष गाड्यांचा समावेश आहे. तसेच अयोध्या, रामेश्वरम आणि रांजणगावला जोडणाऱ्या ‘देव दर्शन’ विशेष गाड्यांनाही प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
चौकट १
पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान
- मालवाहतूक क्षमता : रो-रो सेवा अधिक सक्षम करत वहन क्षमता ५० मेट्रिक टनावरून ५७ मेट्रिक टन करण्यात आली आहे.
- यूएसबीआरएल प्रकल्प : राष्ट्रीय संपर्क व्यवस्था मजबूत करणाऱ्या या प्रकल्पात महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत.
- नवनवीन प्रयोग : ट्रॅक मॉनिटरिंगसाठी प्रथमच ‘ड्रोन’चा वापर करण्यावर भर देण्यात आला असून, मडगाव स्थानकावर लोको रिव्हर्सलसाठी रोड-६ लाईनचा विस्तार करण्यात आला आहे.
- सुरक्षितता : आव्हानात्मक भूभागातील पूल, बोगदे आणि सिग्नलिंग यंत्रणांचे आधुनिकीकरण पूर्ण झाले आहे.
चौकट २
प्रवासी सुविधांमध्ये मोठी सुधारणा
- एक्झिक्युटिव्ह लाउंज : खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली यासह १० प्रमुख स्थानकांवर वातानुकूलित लाउंजची सोय करण्यात आली आहे.
- रेल्वेस्थानक विकास : सावंतवाडी रोड आणि रत्नागिरी येथे ‘रेल आर्केड’ची कंत्राटे देण्यात आली असून रत्नागिरी, थिविम व उडुपी येथे ‘डिजी लॉकर’ सुविधा सुरू झाली आहे.
- दिव्यांगांसाठी करमाळी, थिविम, कारवार आणि उडुपी स्थानकांवर रॅम्प, ब्रेल लिपीतील फलक आणि सुधारित दिशादर्शक लावण्यात आले आहेत.
- प्लॅटफॉर्म विकास: वैभववाडी रोड येथे नवीन पादचारी पूल (FOB), तर कुमटा, गोकर्णा, सुरतकल व मुल्की स्थानकांवर प्लॅटफॉर्मचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
- कोकण रेल्वेने केवळ प्रवाशांची ने-आण न करता शालेय विद्यार्थ्यांसाठी जनजागृती मोहिमा आणि दक्षिण कोकणातील उत्सवांमध्ये आरोग्य सहायता बूथ, मोफत पाणी वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीही जपली आहे.




