जळगावात फिल्मी स्टाईल दरोडा. चोरट्यांनी आधी मालवाहू वाहन चोरले, त्यातून सात लाखांच्या रोकडसह एटीएम मशिनच पळवून नेले!

जळगाव : शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या पोलन पेठ परिसरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. अज्ञात चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने एका बँकेचे एटीएम मशीन उखडून नेऊन त्यातील सुमारे सात लाख रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या धाडसी चोरीमागे चोरट्यांचा पूर्वनियोजित कट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर साधारण एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी प्रथम जोशी पेठ परिसरातून एक मालवाहू वाहनाची चोरी केली. हे वाहन चोरी करून त्यांनी थेट पोलन पेठेतीलच सत्यम प्लाझामधील एक्विटास स्मॉल फायनान्सचे एटीएम केंद्र गाठले. रात्री १:२५ वाजता एक चोरटा तोंडावर रुमाल बांधून एटीएम केंद्रात प्रवेश करताना दिसतो. त्याने अत्यंत कौशल्याने आणि वेगाने एटीएम मशीनला मजबूत दोरखंड बांधला. त्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला हा दोर जोडण्यात आला. काही क्षणांतच वाहनाला जोरात हिसका देण्यात आला. आणि एटीएम मशीन जागेवरून उखडून खाली कोसळले.

चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मशीन खाली पडताच बाहेर दबा धरून बसलेले आणखी तीन साथीदार आत धावून आले. त्यांनी मिळून अवघ्या सहा मिनिटांत संपूर्ण मशीन उचलून वाहनात टाकले. रात्री १:३१ वाजेपर्यंत हा संपूर्ण प्रकार पूर्ण झाला. आणि चोरटे भुसावळच्या दिशेने फरार झाले. चोरट्यांनी दरोडा इतक्या जलद आणि शिताफीने पार पाडला की परिसरातील रहिवाशांना याची कुठलीही चाहूल देखील लागली नाही. मात्र, संपूर्ण घटनेचे सर्व चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू केली. काही वेळातच कंडारी गावाजवळील मन्यारखेडा शिवारात चोरीस गेलेले वाहन आणि फोडलेल्या अवस्थेतील एटीएम मशीन पोलिसांना आढळले. मात्र, चोरट्यांनी मशीनमधील सर्व रोकड आधीच काढून घेतली होती. मशीनचे भाग विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले.

एटीएम मशिनमध्ये होते १० लाख ?

बँकेचे शाखा व्यवस्थापक हरीश गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन एप्रिल रोजी एटीएममध्ये सुमारे १० लाख रुपये भरले होते. चोरीच्या वेळी त्यात अंदाजे सात लाख रुपये शिल्लक होते. चोरट्यांनी ही संपूर्ण रक्कम लंपास केली आहे. तसेच एटीएम मशीनचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असून, एकूण नुकसान ९ लाख ५० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. या घटनेमुळे एटीएम केंद्रांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मध्यवस्तीतील भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी होऊनही कोणतीही तत्काळ दखल न घेतली जाणे, तसेच सुरक्षा रक्षकांचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सीसीटीव्ही चित्रण, वाहनाचा मागोवा आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ही चोरी एखाद्या सराईत टोळीने केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button