
रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
शिवप्रतिष्ठानचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधकांना निवेदन
रत्नागिरी : येथील रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद व्यक्तींचा वावर वाढला असून, सुरक्षेच्या मुद्द्यावरून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. स्थानक परिसर ते हायवेपर्यंतच्या मार्गावर अस्वच्छता पसरवणारे हे लोक नेमके कोण आहेत याची कसून चौकशी करण्याची मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेने क्षेत्रीय रेल्वे प्रबंधकांना दिले.
रेल्वे स्थानकावर अनेक राज्यातील, देशातील लोक ये-जा करतात. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रत्नागिरी रेल्वे स्थानकात दुर्लक्ष होत आहे. गेल्या आठवड्यामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी रेल्वे स्थानकावर गेले असताना तिथे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडीमधून १२ ते १५ व्यक्ती एक्सलेटरवरून वर येताना दिसल्या. त्यांच्याबाबत तिथे असलेल्या तिकीट तपासनीसांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. रत्नागिरी रेल्वेस्थानकावर आलेल्या त्या व्यक्ती आजही रेल्वे स्थानकावरून बाहेर पडणाऱ्या रस्त्यावर रहातात. तिथेच आंघोळ, शौच, जेवण व आग लावून शेकोटी घेण्यासारखे प्रकार करतात. त्यामुळे रेल्वे स्थानक व परिसर खराब होत आहे. अशाप्रकारे कितीतरी लोक या आधीही पाहिलेले आहेत. या संदर्भात रेल्वे प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. रेल्वे स्थानकावर बांगलादेशी यांच्यासह अन्य परदेशी नागरिक येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची कसून तपासणी व चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये रेल्वे स्थानकापासून ते मुख्य महामार्गापर्यंत जो रस्ता आहे, तेथपर्यंत संशयास्पद व्यक्ती ये-जा करीत असतात. आजूबाजूच्या पडक्या इमारतीमध्ये त्यांचे वास्तव्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कारवाई करावी, असे निवेदन क्षेत्रीय रेल्वे प्रबंधकांकडे देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख गणेश गायकवाड, तालुका प्रमुख सुशील कदम, राजेश तोडणकर, हितेंद्र पटेल, सुनील पुर्बीया, हर्षवर्धन बने हे उपस्थित होते.




