विरोधकांचे आंदोलन म्हणजे उशिरा सूचलेले शहाणपण, निवळीचे उपसरपंच संजय निवळकर


मुंबई-गोवा – महामार्गावरील निवळी येथील उड्डाणपुलाचा विषय सध्या चांगलाच तापला आहे. निवळी येथील काही कार्यकर्त्यांनी पुलाच्या संदर्भात पुकारलेल्या धरणे आंदोलनाचा खरपूस समाचार घेत निवळीचे उपसरपंच संजय निवळकर यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही पुलाच्या विरोधात आणि बाजारपेठ वाचवण्यासाठी लढा देत असताना गायब असलेले लोक आता केवळ – राजकारण करण्यासाठी जनतेची दिशाभूल करत आहेत, हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका निवळकर यांनी परशुराम कदम यांच्यावर केली.
संजय निवळकर यांनी यावेळी पुराव्यांसह माहिती दिली की, १८ जुलै २०२४ रोजी त्यांनी सर्वप्रथम केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पत्र देऊन निवळी बाजारपेठ वाचवण्यासाठी उड्डाणपूल रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर २१ डिसेंबर २०२४ ला शेकडो कार्यकर्त्यांसह आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने वर्षभर काम स्थगित ठेवले होते. मात्र, त्यानंतर सरकारी धोरणानुसार पुलाचे काम पुन्हा सुरू झाले.
पुलाचे काम ९० टक्के पूर्ण झाले असले तरी, त्यातील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी निवळकर यांनी ६ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे जाऊन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. यावेळी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक बदल करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले होते. तसेच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे आणि आमदार निलेश राणे हे देखील या प्रश्नावर सकारात्मक असून प्रशासकीय पातळीवर आराखड्यात बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. परशुराम कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनावर बोलताना निवळकर म्हणाले की, जेव्हा आम्ही उड्डाणपूल रोखण्यासाठी संघर्ष करत होतो, तेव्हा हेच लोक काम सुरू ठेवण्यासाठी आग्रही होते. आता काम पूर्णत्वास येत असताना आंदोलनाचे नाटक करून याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button