
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे ‘MITRA: Mind In Training For Right Awareness’ कार्यशाळा उत्साहात संपन्न
शिरगाव, रत्नागिरी
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी आणि कोकण विपश्यना मेडिटेशन सेंटर, पाली यांच्या संयुक्त विद्यमाने “आनापानसती ध्यान तथा मित्र उपक्रम कार्यशाळा – MITRA: Mind In Training For Right Awareness” या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.०० या वेळेत परिषद दालन, मत्स्य तंत्रनिकेतन, शिरगाव येथे पार पडली.
सध्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये ताण-तणाव, भीती, मोबाईलचे व्यसन इ. नकारात्मक मानसिक स्थिती दिसून येतात. त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन व्यवहार व अभ्यासातील प्रगतीमध्ये दिसून येतो. शासनाने सन २०१२ पासून शाळांमध्ये राबविलेल्या ‘आनापानसती ध्यान तथा मित्र उपक्रमाच्या’ प्रभावी अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक, भावनिक व बौद्धिक सकारात्मक बदल दिसून आले आहेत. त्या अनुषंगाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेमध्ये कोकण विपश्यना मेडिटेशन सेंटर, पालीचे विश्वस्त श्री. संतोष आयरे सर यांनी आनापानसती ध्यान पद्धतीचे महत्त्व, मन एकाग्र ठेवण्याचे तंत्र, तणाव व्यवस्थापन तसेच सकारात्मक विचारसरणी विकसित करण्याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेसाठी कोकण विपश्यना मेडिटेशन सेंटरच्या समन्वयक श्रीमती. ज्योती राजेमहाडीक यांचे देखील मार्गदर्शन लाभले. “MITRA” या उपक्रमामार्फत योग्य जागरूकता निर्माण करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा उद्देश व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. केतन चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यशाळा यशस्वीपणे पर पाडण्याकरिता अध्यापन सहाय्यक श्रीमती. मयुरी डोंगरे मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली. नारळ संशोधन केंद्र, भाटे चे प्रमुख श्री. मालशे सर हे उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य आणि एकाग्रता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरल्याचे मत सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.




