टीकाकारांना उत्तर देण्याची वेळ : पालकमंत्री उदय सामंत

जिल्ह्यात नगर पालिका–नगर पंचायतींसाठी महायुतीचा ऐतिहासिक निर्णय

चिपळूण : नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महायुतीची औपचारिक घोषणा केली आहे. नगर पालिका–नगर पंचायतींच्या निवडणुका संयुक्तरित्या लढविण्याचा राज्यात प्रथमच आदर्श रत्नागिरी जिल्ह्याने घालून दिला असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

अतिथी हॉटेलच्या हॉलमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी आमदार राजन साळवी, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, नेते प्रशांत यादव, माजी आमदार सूर्यकांत दळवी, केदार साठे, राहुल पंडित, राजेश बेंडल, माजी आमदार संजय कदम, सदानंद चव्हाण, शिवसेनेचे शशिकांत चव्हाण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे आणि शहराध्यक्ष मिलिंद कापडी, दशरथ दाभोलकर यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते. चर्चेनंतर तिन्ही पक्षांनी चिपळूण नगर पालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगर पंचायतींच्या निवडणुका महायुतीच्या नावाने लढविण्याचा निर्णय निश्चित केला.

उद्या संध्याकाळपर्यंत नगराध्यक्ष पदाचा निर्णय
महत्त्वपूर्ण प्रभागनिहाय चर्चा सुरू असून चिपळूण नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी कोणत्या पक्षाला दिली जाईल, यावर उद्या संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णय होईल, असे उदय सामंत यांनी सांगितले. तसेच तिन्ही पक्षांचे नगरसेवक पदांचे उमेदवारही उद्यापर्यंत जाहीर केले जातील.

महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून सतत होणाऱ्या टीकेवर भाष्य करत सामंत म्हणाले, “रोज सकाळी उठून महायुतीवर टीका करणाऱ्यांना आता या निवडणुकीत ठोस उत्तर देण्याची वेळ आली आहे.” रुसवे-फुगवे विसरून तिन्ही पक्षांनी एकदिलाने आणि संघटितपणे काम करावे, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा संयुक्त लढा ही तिन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बाब ठरणार असून आगामी निवडणुकीत रंगत आणि संघर्ष वाढण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button