विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया; ‘एसआयआर’च्या कामामुळे शालेय कामकाजावर परिणाम!

Special Intensive Revision : मतदारयादीच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला (एसआयआर) १७ ऑगस्टपर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. शाळांतील शिक्षक ‘एसआयआर’च्या कामात बीएलओ म्हणून कार्यरत असल्याने गेल्या महिनाभरापासून शाळांच्या कामकाजावर आधीच परिणाम झाला आहे. आता या मुदतवाढीमुळे आणखी काही दिवस अध्ययन-अध्यापन प्रक्रिया विस्कळीतच राहणार आहे. ‘एसआयआर’च्या कामामुळे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील अर्धे सत्र वाया गेल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यात ३० जूनपासून मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) मोहीम राबवण्यात येत आहे. या कामात केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून शिक्षकांची मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित शाळांतील शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षक संघटनांनी त्या विरोधात आवाज उठवल्यानंतर शिक्षकांना सुटीच्या दिवशी, अध्यापनाच्या वेळेव्यतिरिक्तच्या वेळेत मतदारयादीचे काम करण्याचे सुधारित आदेश देण्यात आले. तसेच काही शिक्षकांना सहायक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या आधीच्या वेळापत्रकानुसार ३० जुलैपर्यंत एसआयआरचे काम चालणार होते. मात्र, त्याला ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता पुन्हा १७ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. या मुदतवाढीचा शाळांच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे शिक्षक संघटनांनी नमूद केले.

गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ शिक्षक ‘बीएलओ’ म्हणून, तर काही बीएलओंना सहायक म्हणून कार्यरत आहेत. परिणामी, काही शाळा सकाळच्या सत्रात, काही शाळा अर्धवेळ चालवाव्या लागत आहेत. शाळांचे कामकाज चांगल्या पद्धतीने होत नसल्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होत आहे. ‘एसआयआर’चे काम करून शाळा कशा चालवायच्या याचे उत्तर कोणीच देत नाही, असे मुख्याध्यापक महामंडळाचे कार्याध्यक्ष तानाजी माने यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे म्हणाले, ”एसआयआर’च्या कामाचा अध्ययन, अध्यापनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पालकांमध्ये नाराजी आहे. आता पुन्हा १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील काम आता पूर्ण होत आले असले, तरी मतदारयादीवरील आक्षेप वगैरे तांत्रिक प्रक्रियांमध्येही ‘बीएलओ’ शिक्षकांना काम करावे लागणार आहे. या कामामुळे अध्ययन, अध्यापनाच्या पहिल्या सत्रातील अर्धे सत्र वाया गेले आहे. परिणामी, शाळेत नीट शिकवले जात नाही म्हणून पुढील वर्षीच्या प्रवेशांवर परिणाम होऊ शकतो.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button