
माझा गाव आणि तालुका आर्थिक, विकासात्मक दृष्ट्या सक्षम करायचा आहे : प्रमोद गांधी
“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाचे झाड हे कातळावर लावलेले असून हे झाड वर्षानुवर्ष टिकेल. या झाडाला फळे, फुले यायला उशीर लागेल. आपण सर्व कार्यकर्ते जशी मला साथ देतोय तशीच साथ देत रहा .आपल्याला राज साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यायची असून, मला माझा गाव आणि माझा तालुका आर्थिक, विकासात्मकदृष्ट्या सक्षम करायचा आहे,” असे स्पष्ट मत मनसेचे गुहागर तालुका विधानसभा संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी व्यक्त केले.
मनसेच्या वतीने शृंगारतळी येथील संपर्क कार्यालयात गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुका मनसेच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मनसेचे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी पुढे म्हणाले की, “मनसेच्या कार्यकर्त्यांमुळेच मी गुहागरमध्ये सक्रिय झालो. मी माझ्या गुहागर तालुक्याची जबाबदारी पार पाडत असताना राज साहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून काम करीत आहे. माझ्याबरोबर अनेक कार्यकर्ते पक्षाचे काम निष्ठेने करत आहेत. पक्ष कामात ते सक्षम आहेत; परंतु आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत हा चिंतेचा विषय असून, कार्यकर्ता आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा होईल यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहे. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने कोणकोणते उपक्रम राबवले जातील याच्यासाठी प्रयत्नशील आहोत.”
माझ्या पश्चात माझा वाढदिवस गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप शिबिर, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा विविध उपक्रमांद्वारे कार्यकर्त्यांनी जे समाजकार्य केले आहे, असे समाजकार्य करत राहा. लोकांच्या सुखदुःखात सामील व्हा. आपल्या पक्षाला यश नक्कीच मिळेल, असा विश्वासही प्रमोद गांधी यांनी व्यक्त करून कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले.
यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जाणवळकर, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, तालुकाध्यक्ष अमित खांडेकर, उपाध्यक्ष तुषार शिरकर, जितेंद्र साळवी, गुहागर तालुका सचिव प्रशांत साठले, सागर तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रथमेश रायकर, कौंढर – काळसूर शाखा अध्यक्ष सुनील मुकनाक, उपविभाग अध्यक्ष विश्वजीत पोतदार, मळण शाखा अध्यक्ष मंगेश धामणस्कर, विशाखा अध्यक्ष दीपक शिंदे, मुंढर शाखा अध्यक्ष सुचित गांधी आदी मान्यवर आणि महाराष्ट्र सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी कोंडकारुळ विभाग उप तालुका अध्यक्षपदी प्रसाद विखारे तसेच कोंडकारुळ विभाग अध्यक्षपदी सचिन सैतवडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसे नियुक्ती पत्र प्रमोद गांधी यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.




