
बेस्ट कामगार सेनेत मोठा फेरबदल करत आमदार सचिन अहिर यांची अध्यक्षपदी नियुक्ती
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बेस्ट कामगार सेनेत मोठा फेरबदल करत आमदार सचिन अहिर यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.अलीकडील बेस्ट कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाने मुंबईतील राजकीय रणनीती बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.बेस्ट कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीतील पराभवानंतर बेस्ट कामगार सेनेचे तत्कालीन अध्यक्ष सुहास सामंत यांनी जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता. त्याचबरोबर संपूर्ण कार्यकारिणीने सामूहिक राजीनामे सादर करून संघटनेत नव्या नेतृत्वाची गरज व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आमदार सचिन अहिर यांच्यावर बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. सचिन अहिर यांचा कामगार चळवळीतील दांडगा अनुभव आणि संघटन कौशल्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. अहिर यांच्या नेतृत्वाखाली बेस्ट कामगार सेना नव्या जोमाने आणि आक्रमकपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



