गॅस टंचाईमुळे लोटेतील उद्योग अडचणीत


लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे उद्योग अडचणीत सापडले असून उपहागृहासह देखभाल-दुरुस्तीची कामे ठप्प झाली आहेत. अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या आदेशानुसार प्रशासनाने उद्योजकांबरोबर तातडीची बैठक घेतली. यावेळी विशेष कोट्यातून गॅस सिलिंडर देण्याची मागणी उद्योजकांकडून करण्यात आली.
या बैठकीस तहसीलदार सुधीर सोनवणे, महानगर गॅसचे अधिकारी पारीख तसेच तालुका पुरवठा अधिकारी देशमुख उपस्थित होते. यावेळी लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. राज आंब्रे यांनी गॅस टंचाईमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत उद्योगांवर होत असलेल्या परिणामांचीं माहिती दिली. तहसीलदार सोनवणे यांनी सध्याच्या परिस्थितीची गंभीरता मान्य करत प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, महानगर गॅसचे इंडस्ट्रियल व कमर्शियल प्रमुख पारीख यांनी सांगितले की, सध्या लोटे औद्योगिक वसाहतीतील गॅस पुरवठा सुरू आहे. उपहारगृह व देखभालीच्या कामांसाठी गॅस आवश्यक असल्यास पाइपलाईनद्वारे पुरवठा करण्याची सुविधा उपलब्ध असून त्यासाठी उद्योगांनी अर्ज करावा, असे त्यांनी सांगितले. ३१ उद्योगांना यावेळी असोसिएशनच्या संचालक मंडळाने तहसीलदारांकडे विशेष कोट्यातून दररोज किमान १०० व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी लवकरच उद्योजकांची जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक आयोजित करणार असल्याची माहिती अध्यक्ष आंब्रे यांनी दिली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button