
डीपीडीसीचा निधी खर्च करण्यात सिंधुदुर्ग राज्यात नंबर वन
राज्य शासनाकडून गतवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासासाठी डीपीडिसीच्या(जिल्हा नियोजन समितीच्या ) माध्यमातून अडीचशे कोटी रूपयांचा निधी मिळाला होता. यातील ९८ टक्के निधी आत्तापर्यंत खर्च झाला आहे.निधी खर्च करण्यात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. पुणे दुसरा तर सोलापूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.कणकवली येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, जिल्हा प्रशासनात आर्थिक शिस्त आणण्यासाठी पावले उचलून विकासाचा निधी पूर्ण खर्च करून जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री पदाचा भार स्वीकारल्यानंतर सांगितले होते. मागील वर्षीचा २५० कोटींचा निधी खर्च करण्याचे नियोजन केले. यातील ९८ टक्के निधी खर्च झाला आहे. पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा आपला जिल्हा नियोजन निधी खर्चात ३२ व्या क्रमांकावर होता. आता राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत प्रथम क्रमांकावर आहे.