
शिवसेनेच्या (ठाकरे) नगरसेविका सरिता म्हस्के अखेर सापडल्या
मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या (ठाकरे) नगरसेविका सरिता म्हस्के यांच्यासोबत संपर्क होत नसल्याने बुधवारी दिवसभर उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.शिवसेनेच्या (ठाकरे) गटस्थापनेच्या वेळीही त्या अनुपस्थित होत्या. त्यामुळे गोंधळ उडाला होता. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती, आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी बुधवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास त्या पोहोचल्या आणि शिवसेनेचा (ठाकरे) पहिल्या नगरसेविका फुटल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी आणि मतमोजणी १६ मार्च रोजी पार पडली. निवडणुकीत भाजपचे ८९, शिवसेनेचे (ठाकरे) ६५, शिवसेनेचे (शिंदे) २९, काँग्रेसचे २४, एआयएमआयचे ८ मनसेचे ६, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ३, समाजवादी पार्टीचे २, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १ असे एकूण २२७ नगरसेवक विजयी झाले. निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन सहा दिवस लोटले तरीही मुंबईच्या महापौरपदी अद्याप निवड होऊ शकलेली नाही. भाजप सर्वाधिक संख्याबळ असलेला पक्ष ठरला आहे. मात्र भाजपला महापौर पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची (शिंदे) गरज भासणार आहे. त्यातच शिवसेनेच्या (शिंदे) नगरसेवकांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
महापर पदाच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष संख्याबळाची जुळवाजुळव करीत आहेत. महापौर कोणत्या पक्षाचा होणार याबाबत उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीनंतर निवडून आलेल्या नगरसेवकांच्या गटाची कोकण भवन आयुक्तांकडे स्थापना करावी लागते. एकेका राजकीय पक्षाची नेते मंडळी आपापल्या नगरसेवकांसोबत कोकण भवनमध्ये
जाऊन गटाची नोंदणी करीत आहे. शिवसेनेचे (ठाकरे) नवनिर्वाचित नगरसेवक बुधवारी गट स्थापनेसाठी बुधवारी कोकण भवन येथे गेले होते. मात्र प्रभाग क्रमांक १५७ मधून विजयी झालेल्या शिवसेनेच्या (ठाकरे) नगरसेविका सरिता म्हस्के त्यावेळी अनुपस्थित होत्या. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.




