रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव म्हणून ओळख देण्याची घोषणा.

रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव म्हणून ओळख देण्याची घोषणा मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील एका कार्यक्रमात केली. मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव करण्यासाठी सव्वा कोटीच्या निधीला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी जाहीर व्यासपीठावरून दिली. यामुळे ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून ओळख निर्माण करण्याचे कवी केशवसुतांच्या मालगुंड गाववासीयांचे काही वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.वाचन चळवळीला उपयुक्त ठरणाऱ्या उपक्रमांना राज्य शासनाकडून चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुस्तकांचे गाव हा एक त्यातील उपक्रम होता. यासाठी कोमसापचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर आणि प्रमुख विश्वस्त रमेश कीर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

पुस्तकांच्या गावांसाठी केशवसुतांच्या मालगुंडचा प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर मार्च २०२१ मध्ये भाषा विकास मंत्रालयाची एक समिती मालगुंडला आली होती. त्यावेळी केशवसुत स्मारकांमध्ये कोमसाप पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. प्राथमिक चाचपणीत ग्रामस्थांनीही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांकडूनही हिरवा कंदील मिळाला होता.प्रत्यक्ष भेटीवेळी भाषा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मालगुंड गावांमध्ये किती ठिकाणी पुस्तकांचे स्टॉल ठेवता येथील याची पाहणी केली. यामध्ये गावातील शाळा, ग्रामस्थांची घरे, हॉटेल्स यासह केशवसुत स्मारक ग्रंथालयाचा समावेश होता.

या संबंधित ठिकाणी ग्रंथालयाप्रमाणे रचना केली जाणार असून पुस्तक ठेवण्यासाठी दोन मोठे स्टॅण्ड, बसण्यासाठी खुर्ची-टेबल ठेवण्यात येणार आहे. संबंधित ठिकाणी प्रवेशद्वारावर पुस्तकांचे गाव म्हणून पाटीही लावली जाणार आहे. आवडीची पुस्तके वाचण्याबरोबरच त्याच्या विक्रीचीही व्यवस्था केली जाणार आहे.यामध्ये कादंबरी, कथा, कवितांचे दालन, चरित्रग्रंथ यासह वेगवेगळी पुस्तके ठेवण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button