कीर्तनसंचित, राघवयादवीयम् पुस्तकांचे कीर्तनसंध्या महोत्सवात प्रकाशन.
रत्नागिरी : रामराज्य ते महाभारत कीर्तनसंचित आणि राघवयादवीयम् या दोन पुस्तकांचे प्रकाशन येथे सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात झाले.तेरा वर्षांपूर्वी २०१२ साली कीर्तनसंध्या या उपक्रमाचा प्रारंभ झाला. कीर्तन प्रामुख्याने उत्सवामध्ये आणि मंदिरांमध्ये सादर केले जाते. मात्र कीर्तन हा समाजप्रबोधनाचा एक महत्त्वाचा आविष्कार आहे. ज्ञानेश्वरी, दासबोधासारखे ग्रंथ फक्त देवघरात नकोत, तर दिवाणखान्यात आले, तर प्रगती होईल, असे म्हटले जाते. त्याच उद्देशाने तसेच हिंदू धर्माविषयी प्रसारित केल्या जाणाऱ्या चुकीच्या विमर्शांना सत्याने उत्तर द्यावे, या हेतूने कीर्तनसंध्या उपक्रमाचा प्रारंभ झाला. राष्ट्रीय कीर्तनकान हभप चारुदत्तबुवा गोविंदस्वामी आफळे यांनी या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा दिला.
लोकजागृती आणि राष्ट्रप्रेमाचे धडे कीर्तनाच्या माध्यमातून तरुणांसह संपूर्ण समाजाला घालून द्यावेत, हा कीर्तनसंध्या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश ठरविण्यात आला. त्यानुसार शिवाजी महाराजांपासून कारगिल युद्धापर्यंतचा इतिहास श्रोत्यांसमोर मांडण्यात आला. गेल्या वर्षी अयोध्येत रामजन्मभूमीवर राममंदिराची स्थापना झाली. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी आले रामराज्य हा विषय कीर्तनसंध्येसाठी घेण्यात आला. यावर्षी महाभारत हा मुख्य विषय आहे. त्याचे निरूपण येत्या रविवारपर्यंत, १२ जानेवारीपर्यंत प्रमोद महाजन क्रीडा संकुलावर उभारण्यात आलेल्या भव्य मंचांवर सुरू आहे.
महाभारताविषयी उत्सुकता निर्माण व्हावी, या हेतूने कीर्तनसंचित नावाची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. तिचे प्रकाशन आफळेबुवांच्या हस्ते झाले. कांचीपुरम् येथे सतराव्या शतकात कवी वेंकटाध्वरी यांनी ‘राघवयादवीयम्’ या श्लोकसंग्रहाची रचना केली. या श्लोकांमधील पहिली ओळ रामकथा, तर याच श्लोकाची अक्षरे उलट्या क्रमाने वाचली, तर ती कृष्णकथा होते.
या श्लोकसंग्रहाच्या कोकण मीडिया सत्त्वश्री प्रकाशनाने तयार केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशनही कीर्तनसंध्याच्या व्यासपीठावर बुवांच्या हस्ते झाले. अनुक्रमे ५० आणि २५ रुपयांच्या या पुस्तिका महोत्सवाच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कीर्तनसंध्या परिवाराचे अध्यक्ष अवधूत जोशी यांनी दिली.