
रत्नागिरी- आर्ट सर्कलचा शास्त्रीय संगीत महोत्सव जानेवारीत
रत्नागिरी, ता. २२ : रत्नागिरीच्या सांस्कृतिक विश्वातील लोकप्रिय आर्टसर्कलचा अठरावा शास्त्रीय संगीत महोत्सव येत्या जानेवारीला २४ ते २६ या तारखांना रंगणार आहे.बंगलोरचे गायक सिद्धार्थ बेलामन्नू, बंगलोरच्या शास्त्रीय गायिका विदुषी भारती प्रताप यांचे गायन तसेच पं. योगेश समसी यांचे सोलो तबलावादन रंगणार आहे. यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिन वादन आणि एस. आकाश यांचे बासरीवादन, डॉ. शंतनू गोखले यांचे संतूरवादन आणि हुबळीचे सुप्रसिद्ध गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या गायनाने हा महोत्सव अतिशय सुरेल होणार आहे.
रत्नागिरीचा हा महोत्सव संपूर्ण भारतात आणि परदेशातही पोहोचला आहे. महोत्सवाचे उद्घाटन २४ जानेवारीला सायंकाळी ७ वा. होईल. त्यानंतर बंगलोरचे सुप्रसिद्ध गायक बेलामन्नु यांचे गायन होईल. त्यांना रत्नागिरीचे वरद सोहनी संवादिनी साथ व प्रणव गुरव तबलासाथ करणार आहेत. साडेआठ वाजता पं. समसी यांचा तबला सोलो होणार आहे. उत्तम संगीत साथीदार आणि उत्तम एकल वादक असा दुर्मिळ संयोग या निमित्ताने रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यांच्यासोबत पुण्याचे मिलिंद कुलकर्णी संवादिनीवर लेहरासाथ करणार आहेत.दुसऱ्या दिवशी २५ ला सायंकाळी ७ वा. युवा व्हायोलिन वादक यज्ञेश रायकर आणि बासरीवादक एस. आकाश यांचे सहवादन होईल. त्यांना रत्नागिरीचे प्रथमेश तारळकर पखवाजसाथ आणि विवेक पंड्या तबलासाथ करणार आहेत.
त्यानंतर बंगलोरच्या शास्त्रीय गायिका विदुषी भारती प्रताप यांचे गायन रंगणार आहे. मानाच्या सर्व महोत्सवामध्ये सादरीकरण केलेल्या विदुषी भारती यांना पं. अजय जोगळेकर संवादिनीसाथ तर बेंगलोरचे योगीश भट तबलासाथ करणार आहेत.पं. मेवुंडी यांच्या गायनाने समारोपमहोत्सवाच्या समारोपाला २६ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता डॉ. शंतनु गोखले यांचे संतूर वादन होणार आहे. त्यांना दिल्लीचे तबलावादक यशवंत वैष्णव साथसंगत करणार आहेत. त्यानंतर हुबळीचे गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या सुश्राव्य गायनाने महोत्सवाची सांगता होईल. पं. भीमसेन जोशी यांच्या गायकीची आठवण करून देणाऱ्या या गायकीने महोत्सवाचा हृद्य समारोप होणार आहे. त्यांना यशवंत वैष्णव तबला तर पं. अजय जोगळेकर संवादिनीसाथ करणार आहेत..