नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत आणखी १०० पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्याची सूचना.
जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत आणखी १०० पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्याची सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिली होती.त्यामुळे ही कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांची धावपळ सुरू आहे.जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत ‘हर घर नल जल से’च्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळजोडणीद्वारे ५५ लिटर प्रतिदिन प्रतिव्यक्ती पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात १ हजार ४३२ योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी १ हजार १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. जिल्ह्यातील ४२६ गावांमध्ये १०० टक्के नळजोडणीचे काम पूर्ण झालेले आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबाला घरगुती स्तरावर नळजोडणी देण्यात आली आहे. आणखी योजनांची कामे सुरू आहेत. त्यापैकी १०० कामे नोव्हेंबर, २०२४ पर्यंत पूर्ण करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी दिली होती.