जगविख्यात कोकाकोला कोकणातील प्रकल्प उभारणीला मुहूर्त मिळाला

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत विस्तारीत क्षेत्रातील असगणीच्या माळरानावर जगविख्यात कोकाकोला प्रकल्प उभारणीला मुहूर्त मिळाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या न्यूयॉर्क दौर्‍यात करार झाल्यानंतर तब्बल ६ वर्षानी या प्रकल्पाच्या उभारणीच्यादृष्टीने आवश्यक ती पूर्तता एमआयडीसीकडुन पूर्णत्वास गेल्यानंतर उभारणीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी ताबा मिळालेल्या ४७ एकर जागेभोवती सुमारे २ कि.मी. लांबीची संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरू झाले आहे. साधारणपणे हजार कोटींच्या दरम्यान गुंतवणूक असणार्‍या या प्रकल्प उभारणीस प्रत्यक्षात डिसेंबरनंतरच सुरूवात होणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अमेरिका दौर्‍यात कोकणच्या औद्योगिक विकासाच्यादृष्टीने महत्वपूर्ण पाऊल पडताना शीतपेय बनवणार्‍या जगविख्यात कोकाकोला कंपनीबरोबरच्या करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. सुमारे हजार कोटी रुपये गुंतवणुकीतून उभा राहणार्‍या या प्रकल्पातून ज्यूस, बाटली बंद पाणी व शीतपेय यांचे उत्पादन घेतले जाणार असल्याचे त्यावेळी जाहीर करतानाच या प्रकल्पातून मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले होते. राज्यातील हा चौथा प्रकल्प असल्याने कोकाकोला प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी यापूर्वी अनेकवेळा या औद्योगिक वसाहतीत येवून पाहणी करत परिसरातील हवा, पाणी, मातीचे नमुने घेतले होते. मात्र तरीही प्रकल्प उभारणीला मुहूर्त मिळत नव्हता. प्रकल्पाच्यादृष्टीने महत्वाचे असलेल्या कोयनेचे प्रचंड अवजल, जवळचा कोकण रेल्वे मार्ग, तसेच गरज पडलीच तर गुहागर अथवा दापोली हे जवळचे बंदर या गोष्टी प्रकल्पासाठी महत्वपुर्ण असल्याने प्रकल्पाची येथे उभारणी जवळपास निश्‍चित झाली होती. मात्र त्यानंतर अचानकपणे या प्रकल्पाने लोटेतून बारामतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तेेथे एमआयडीसीने त्यांना ९० एकर जागा दिली. त्या जागेचे शुल्कही आकारणी झाली. मात्र प्रकल्प उभारणीला सुरूवात केली नव्हती, असे असतानाच कोरोनानंतर राज्य सरकारमध्ये औद्योगिकदृष्ट्या वातावरण काहीसे सकारात्मक झाल्यानंतर एमआयडीसीनेही कोकाकोलाला प्रकल्प उभारणीसाठीचे पर्याय दिले आणि त्यातूनच कोकाकोलाने पुन्हा लोटेकडेच आपला मोर्चा वळवला. या प्रकल्पासाठी शंभर एकर जागेची मागणी करण्यात आली असताना सध्या एमआयडीसीने ४७ एकरवर ताबा दिला आहे. लागणारी अधिकची जागा देण्याची तयारीही दर्शविली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button