वाढत्या चोर्यांच्या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर प्रवाशांची सुरक्षा अधिक मजबूत होणार.
कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसह रेल्वेगाड्यांमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी रल्वेस्थानकात लोहमार्ग पोलीस स्थानकाच्या उभारणीस मंजुरी मिळाली आहे. यासाठी शासनाकडून ९१ लाख ७० हजार रुपयांच्या निधीस मान्यता मिळाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या लोहमार्ग पोलीस स्थानकात १५२ अधिकारी व कर्मचार्यांची पदनिर्मितीही करण्यात येणार आहे. यामुळे कोकण मार्गावर प्रवाशांची सुरक्षितता अधिक बळकट होणार असून वाढत्या गुन्हेगारीलाही चाप बसणार आहे.मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हद्दीत येणार्या रेल्वेस्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेसह गुन्ह्यांची उकल करण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर आहे. रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा रेल्वे सुरक्षा दलाच्या अखत्यारित आहे. सीएसएमटी मुंबई ते पनवेल व कर्जत, खोपोली, मंकी हिलपर्यंत लोहमार्ग पोलिसांची हद्द आहे. रोहा रेल्वेस्थानकापासून कोकण रेल्वेची हद्द सुरू होते. या हद्दीतील प्रवाशांच्या सुरक्षेसह गुन्ह्यांच्या तपासासाठी जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर आहे. कोकणातून मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वेगाड्यांतून प्रवास करणार्या महिला प्रवाशांचे दागिने लंपास करण्यासह गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. रेल्वे डब्यातील आरक्षित आसनांवर प्रवासी गाढ झोपल्याची संधी साधत चोरट्यांकडून मोबाईलही लंपास केले जात आहेत. www.konkantoday.com