मुंबई गोवा महामार्गावर आजपासून पोलिसांची २४ तास ड्युटी
. लाडक्या गणरायाच्या आगमनास अवघे काही दिवस राहिले असताना गावी निघालेल्या चाकरमान्यांच्या वर्दळीने महामार्ग गजबजू लागला आहे. चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासाकरिता पोलीस यंत्रणादेखील सज्ज झाली आहे. महामार्गावरील पळस्पे फाट्यापासून सिंधुदुर्गापर्यंत ४ ते १५ सप्टेंबर या कालावधीत पोलीस २४ तास सेवा बजावणार आहेत. महामार्गावर मोक्याच्या ठिकाणी चाकरमान्यांसाठी सुविधा केंद्रांची देखील उभारणी करण्यात येणार आहे. ७ सप्टेंबर रोजी गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी चाकरमानी गावाकडे निघू लागले आहेत. महामार्गावरून वेगाने धावणार्या वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेर्याची करडी नजर राहणार असून अशा वाहनांना वॉकीटॉकीधारी पोलिसांकडून संदेश गेल्यास केवळ ३ कि.मी. अंतरावर अडवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ठिकठिकाणी चालक व वाहकांचे समुपदेशन केले जाणार आहे. महामार्गावर विशेष पोलीस कक्षांसह उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्रात चाकरमान्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. www.konkantoday.com