मुंबई-गोवा महामार्गाबाबत नितीन गडकरींचे थेट आदेश, गणेशोत्सवापूर्वी प्रवास होणार सुखकर
*Mumbai Goa National Highway : रस्ते मार्गाने कोकणात जाण्याऱ्या मुंबईकरांचा प्रवास म्हणजे मोठे संकट आहे. खड्ड्यातून मार्ग काढत कोकण गाठावे लागत आहे. या महामार्गासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बातम्या येत आहे. आता मुंबई-गोवा महामार्ग 66 च्या दुरावस्थेबाबत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना पत्र लिहिले. त्या पत्राची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गणेशोत्सवापूर्वी हा महामार्गे खड्डेमुक्त करण्याचे आदेश दिले. त्यासंदर्भातील पत्र केंद्रातील रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे तांत्रीक सल्लागार बालासाहेब ठेंग यांनी संबंधीत विभागांना दिले आहे.**रवींद्र वायकर यांनी घेतली गडकरींची भेट*मुंबई-गोवा ४७१ कि.मी राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०११ पासून सुरु आहे. परंतु हे काम पूर्ण होत नाही. त्यानंतर समृद्धी महामार्ग तयार झाला. पण हा महामार्ग अजूनही पूर्ण झाला नाही. या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहे. यामुळे या मार्गावरून गावी जाणाऱ्या कोकणातील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरून जाणाऱ्या चाकरमान्यांना कोकणातील घर गाठण्यासाठी 16 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. अखेर या महामार्गाबद्दल खासदार रवींद्र वायकर यांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांना यासंदर्भात पत्र दिले.*नितीन गडकरी यांचे आश्वासन*गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा राज्य मार्गावर असणारे सर्व खड्डे बुजवण्यात येतील. हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री नितिन गडकरी यांनी खासदार वायकर यांना दिले आहे. त्यानंतर संबंधीत विभागाला पत्र देऊन महामार्गावरील सर्व खड्डे बुजण्याचे आदेश दिले.*पृथ्वीराज चव्हाण यांची टीका*माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुती सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, मुंबई गोवा महामार्गाची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. मात्र काहीही केले तरी चाकरमान्यांना दिलासा मिळणार नाही. हा सरकारचा गलथान कारभार आहे. अदानी, अनिल अंबानींना रस्ते बांधण्याचा किती अनुभव आहे हे सर्वांना माहिती आहे. आपल्या मित्रांना प्रॉफिट मिळावा यासाठी रस्त्याचे काम त्यांना दिले जाते. त्यांच्यापुढे नितीन गडकरी यांचेही काहीही चालत नाही. कारण सगळी निर्णय वरून होत असतात. महामार्गाचा प्रश्न असल्याने राज्य सरकार यात अधिक काही करू शकत नाही. कॉन्ट्रॅक्ट देणे आणि कमिशन मिळवणे इतकेच त्यांच्या हातात आहे. त्यामुळे चाकरमान्यांना आमच्या सरकारची वाट बघावी लागेल. आमचे सरकार आल्यानंतर प्राधान्याने आम्ही या महामार्गाकडे लक्ष देऊ. या विभागात वाढलेल्या कमिशन खोरीला आळा घालू, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.