पावसाचा तडाखा, त्यात डेंग्युचा विळखासैतवडे गुंबद परिसरात डेंग्युचे थैमान; आरोग्य विभाग सुस्त
रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाबरोबरच रोगराईने देखील जोर धरल्याचे चित्र दिसू लागले आहे. केवळ दाट वस्ती असलेल्या शहरांमध्ये नव्हेच तर ग्रामीण भागात देखील याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामध्ये डेंग्युचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. असे असतानाही जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग मात्र हातावर हात ठेवून बघ्याची भूमिका घेताना आहे. सैतवडेमध्ये अशीच काहीशी परिस्थिती असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. यामुळे परिसरातील जनतेच्या जीविताला धोका उत्पन्न झाला आहे. व्यवस्था असुनही व्यवस्थापन नसल्याने आरोग्य विभाग ग्रामस्थांच्या जीवाशी खेळत आहे का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जातआहे.सैतवडे गावातील गुंबद ग्रामपंचायत हद्दीत डेंग्युच्या प्रादुर्भावाने डोके वर काढले आहे. गेल्या 15 दिवसांपासून या भागामध्ये डेंग्युचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. प्रत्येक घरामध्ये एकदोन रूग्ण तरी सापडत आहेत. तरी देखील आरोग्य खात्याने म्हणावे तसे गांभिर्याने याकडे लक्ष दिलेले दिसत नाही. या भागातील सरपंचांकडे माहिती घेतली असता असे समजले की, आरोग्य खात्याकडून औषध फवारणीसाठी औषध आलेले आहे, पण त्यासाठी लागणारा पंप उपलब्ध नसल्यामुळे फवारणी होऊ शकलेली नाही. तसेच आम्ही याबद्दल जिल्हा परिषद आरोग्य विभागाला माहिती दिली आहे. या भागातील लोकांचे असेही म्हणणे आहे की, एखादी जीवितहानी झाल्यानंतरच आरोग्य विभाग याची दखल घेणार आहे का? काही रूग्ण रत्नागिरीमध्ये खाजगी रूग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात दाखल सुद्धा करण्यात आले आहे, अशी माहिती सैतवडे ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे.