ज्याच्यावर पोक्सोखाली गुन्हा दाखल आहे, अशा शिक्षकाला तात्काळ शाळेबाहेर काढा. , सागवे शाळेत पालकांनी घेतली आक्रमक भूमिका, पोलिसांचा हस्तक्षेप


राजापूर तालुक्यातील सागवे हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शिक्षक प्रकरणावरून पालकांनी मोठी आक्रमक भूमिका घेतली
ज्याच्यावर पोक्सोखाली गुन्हा दाखल आहे, अशा शिक्षकाला तात्काळ शाळेबाहेर काढा. अन्यथा आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही अशी भूमिका घेतल्याने गोंधळ उडाला शेवटी पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला,

सप्टेंबर २०२४ मध्ये विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप असलेला शिक्षक बलवंत आनंदा मोहिते याला पुन्हा शाळेत रुजू करून घेण्यात आल्याने पालक आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत शाळेवर धडक दिली. या प्रकाराविरोधात आवाज उठवत त्यांनी संबंधित शिक्षकाविरोधात तात्काळ कारवाईची मागणी केली.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने नाटे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेतली. शिक्षक मोहिते याच्याविरोधात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला १ जुलै २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या गंभीर प्रकारानंतर पालक, ग्रामस्थ आणि शाळा प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत मोहिते याला पुन्हा शाळेत न घेण्याचा निर्णय एकमताने घेतला गेला होता. मात्र, त्याच्या विरोधातील आरोप गंभीर असूनही सोमवारी, १६ जून रोजी तो पुन्हा शाळेत हजर झाल्याचे लक्षात आल्यानंतर पालक संतप्त झाले.
“ज्याच्यावर विद्यार्थिनींसोबत गैरवर्तनाचे गंभीर आरोप आहेत, त्याला शाळेत पुन्हा कसा घेतले?” असा सवाल संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला विचारला. मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागानेच त्याला पाठीशी घातल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
सदर शिक्षकाने सप्टेंबर २०२४ नंतर शाळेला गैरहजेरी लावली होती, तरीदेखील त्याचे नाव नियमितपणे मस्टरवर घेऊन त्याला वेतन देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. १६ जून रोजी त्याने ‘स्वहस्ताक्षरित’ पत्राद्वारे हजर असल्याचे कळवले आणि त्यानंतर त्याला शाळेत पुन्हा प्रवेश दिला गेला.
सदर प्रकारानंतर संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले की, “ज्याच्यावर पोक्सोखाली गुन्हा दाखल आहे, अशा शिक्षकाला तात्काळ शाळेबाहेर काढा. अन्यथा आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही.” त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
घटनेची माहिती मिळताच नाटे पोलीस ठाण्याचे अधिकारी शाळेत दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला व त्याला ताब्यात घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button