रत्नागिरीतील छोट्या मोठ्या व्यावसायिकांकडून पिग्मी गोळा करत महामुंबईतील एका कंपनीने लाखो रुपयांचा चुना लावला
रत्नागिरीकरांना कुणीही यावे आणि उल्लू बनवून जावे, अशी स्थिती आजकाल येथे सुरू असलेल्या गुंतवणुकदारांच्या फसवणूक प्रकरणी वारंवार समोर येऊ लागली आहे. आरजू टेक्सोल कंपनीने रत्नागिरीकरांना कोट्यवधींचा गंडा घातलेला असतानाच रत्नागिरीतील छोट्या मोठ्या व्यावसायिकांकडून पिग्मी गोळा करत महामुंबईतील एका कंपनीने लाखो रुपयांचा चुना लावण्याच्या चर्चेने या सार्यांचीच झोप उडाली आहे.गेल्या ४-५ दिवसांपासून या कंपनीचे कार्यालय बंद झाले आहे. तर येथील कर्मचारी व संचालकांचेही फोन नॉट रिचेबल येवू लागल्याने पिग्मीधारक हडबडले आहेत. रत्नागिरीत वर्ष दीड वर्षापूवीर्र्च या महामुंबईतील एका कंपनीने आपले प्रस्थ सुरू केले. स्थानिक छोट्या मोठ्या व्यापार्यांकडून पिग्मी स्वरूपात नियमित रक्कम गोळा करण्यास सुरूवात केली. अनेक व्यावसायिकांनी या कंपनीत बचत होईल, या उद्देशाने पिग्मीही या कंपनीकडे सुरू केली होती.कंपनीने आपल्या कारभाराची छाप पाडण्यासाठी पिग्मी गोळा करणार्या एजंटांनाही खूश करण्याची योजना आखली. कंपनीत पिग्मीचे प्रमाण वाढवावे म्हणून चांगले काम करणार्या एजंटाना देशांतर्गत अनेक मोठ्या शहरांच्या विमान प्रवासाद्वारे सफरही घडवून आणल्या. त्यामुळे एजंटही खूश झाले. त्यांच्यामध्ये स्पर्धा वाढली होती. त्यांनी अनेक व्यापार्यांना पिग्मीसाठी तयार केले. त्याद्वारे दिवसाची लाखोंची रक्कम गोळा होत होती. परंतु येत्या सप्टेंबरपासून पिग्मीची मुदत झालेल्यांना पैसे परत देण्यास कंपनीने टाळाटाळ सुरू केली. काहींना दिलेले धनादेशही वटले नाहीत. त्यांनीही या कंपनीकडे पाठपुरावा सुरू केला आहे. गुंतवणुकदारांचे म्हणणे आहे की, त्यानंतरही पिग्मी गेले काही महिने सुरू राहिली होती. शहरातील साळवी स्टॉप परिसरात याा कंपनीचे कार्यालय आहे. मागील पाच-सहा दिवसांपासून या कंपनीच्या कार्यालयाला कुलूप आहे. त्यामुळे गुंतवणूक केलेल्या पिग्मीधारकांमध्ये खळबळ माजली आहे. कंपनीने त्या कार्यालयाचे भाडेही थकवले गेल्याची चर्चा आहे. www.konkantoday.com