
नर्मदा परिक्रमा ही सर्व समस्यांवर मात करून पूर्ण केलेली मानसिक तपश्चर्या होय
कुवारबाव जेष्ठ नागरिक मेळाव्यात सौ. मधुरा चिंचाळकर, सौ.नेहा देशकुलकर्णी यांचे परिक्रमेबाबत अनुभव कथन*रत्नागिरी (प्रतिनिधी) : नर्मदा परिक्रमा ही एखादी सहल नसून आध्यात्मिक शक्तीच्या बळावर, शारीरिक समस्यावर मात करत पूर्ण केलेली मानसिक तपश्चर्या होय. 120 दिवसांच्या नर्मदा परिक्रमेमुळे सेवाभाव, भक्ती आणि श्रद्धा याद्वारे जन्मोजन्मीचे ऋण फेडण्याचे मिळालेले भाग्य होय, अशा शब्दात नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या मधुरा चिंचाळकर आणि सौ. नेहा देशकुलकर्णी या ज्येष्ठ महिला भगिनीनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिनांक 25 मे रोजी संपन्न झालेल्या मासिक स्नेह मेळाव्यात मिरजोळे येथील ज्येष्ठ नागरिक भगिनी सौ.मधुरा चिंचाळकर व सौ. नेहा देशकुलकर्णी यांनी प्रतिदिनी 20 ते 25 किलोमीटर प्रमाणे १२० दिवसांच्या सुमारे साडेतीन हजार किलोमीटर नर्मदा परिक्रमेच्या प्रवासाचे चित्तथरारक अनुभव कथन केले. छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या चार राज्यातून 2056 किलोमीटर अंतर वाहणाऱ्या नर्मदा नदीचे पावित्र्य सर्वत्र भक्ती भावाने जपले जाते. डोंगरदऱ्या जंगल दुर्गम ग्रामीण परिसर आणि नर्मदा तीरावरून प्रवास करताना दमछाक होते. मात्र अज्ञात अध्यात्मिक शक्तीमुळे मानसिक बळ मिळते, असे अनुभव कथन करून त्यांनी नर्मदा परिक्रमा तरुणांबरोबरच ज्येष्ठांनीही मात्र योग्य वयात जरूर अनुभवावी, असे आवाहन केले. संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मेळाव्यात सौ. चिंचाळकर व सौ. देशकुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मे महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. सेवानिवृत्त डेपो मॅनेजर श्री. दिलीपराव साळवी यांनी त्यांना भक्ती गीतातून शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष श्री. अंबरे यांनी गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ ही संकल्पना साकार करण्यासाठी ज्येष्ठांना संघटनेतर्फे आवाहन केले. तर श्री. श्याम सुंदर सावंत देसाई यांनी 15 जून रोजी संपन्न होणाऱ्या जेष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिनाची संकल्पना विशद केली तसेच फेसकॉमच्या मनोहारी मनोयुवा या मासिकाचे वर्गणीदार होण्याचे आवाहन केले.यावेळी संघाचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र कदम, सचिव श्री. सुरेश शेलार, सुधाकर देवस्थळी, वसंतराव पटवर्धन, प्रसिद्धी प्रमुख श्री. प्रभाकर कासेकर तसेच श्री. नारायण नानिवडेकर, शशिकांत घोसाळकर सहित जेष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी पसायदानाने मेळाव्याची सांगता झाली. पुढील स्नेह मेळावा 29 जून रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले.