मी आदिवासी की डिजिटल भारताचा वनवासी -सिमाली भाटकर, रत्नागिरी:
आदिवासी म्हणजे मुळ निवासी असा अर्थ आपल्या सर्वांना अभिप्रेत आहे.संस्कृत भाषेत त्यांना आत्विक किंवा वनवासी असेही म्हटले जाते.संथाल,गोंडा,मुंडा,खडीया,हो ,बोजे,भिल्ल,खासी,गरसिया,सिररीया,मीणा,उनाव,बिरहोर अशा विविध आदिवासीच्या जाती-जमाती आढळून येतात. उडिसा,मध्यप्रदेश, राजस्थान,गुजरात, झारखंड, छत्तीसगड ,बिहार ,मिझोरम या राज्यात ते दिसून येतात. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटली तरी आदिवासी बांधव अजूनही उपेक्षित आहे.महात्मा गांधीनी त्यांना गिरीजन म्हणजे पर्वतावर राहणारे असे संबोधले आहे.पहाडांवर राहणारे हे जंगलातील राजे आज मात्र इमारतींच्या आधुनिकीकरणात एकटा पडला आहे. आपण नेहमीच म्हणतो मानव चंद्रावर-मंगळावर पोहचला. मग त्यांचे विचार तितके श्रेष्ठ का नाही झाले? एका बाजूला आधुनिकीकरणाने विकसित झालेला भारत तर त्याचवेळी दुसऱ्या बाजूने मागासलेला आदिम समाज अशी विषमता आढळते.
समाजशास्ञीय दृष्टिकोनातून पाहिले तर त्यांच्या पुष्कळ समस्या आपल्याला दिसून येतात. जंगलात राहत असल्याने त्यांच्या पर्यंत सुविधा पोहोचत नाही. निरोगी आरोग्याची त्यांना माहिती नसते तर एखाद्या दुर्गम भागात जाऊन आदिवासींना निरोगी आरोग्याबाबतची माहिती देणे, आरोग्य सेवकांना धाडसाचे काम वाटते मग ते त्या कामातून अंग काढून घेतात. शिक्षणाचे ही तसेच आहे. आदिवासींची बोली,लिपी ही वेगळी असते.ती समजुन त्यांच्या मुलांना शिकवणे खूप अवघड असते हे जरी खरं असले तरी त्यांना ज्ञानापासून वंचित ठेवणे चुकीचे ठरेल.आदिवासी समाजातील कितीही आमदार-खासदार निवडून आले तरी एकदा त्यांना शहरीकरणाची व पैशाची हवा लागली कि ते या स्वतःच्या आदिवासी लोकांकडे दुर्लक्ष करतात.
अशा अज्ञान व अंधकारमय वातावरणात खिचपत पडलेल्या समाजाला प्रकाशमय करण्यासाठी एक लखलखता तारा जन्माला आला. डॉ.प्रकाश आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प सुरू करुन अंधकारमय जीवन जगणाऱ्या आदिवासींना प्रकाशाचे दिशेने वाटचाल करण्यास लावली आहे. ज्या गडचिरोली भागात नौकरी करण्यास सरकारी कर्मचारी ,पोलिस घाबरतात अशा ठिकाणी आमटेनी आदिवासींचे पुर्नवसन केले. स्त्रीयांवर अत्याचार केले जात होते. तेथील युवक-युवती नक्षलवादी कसे होतात याचा अभ्यास करुन इत्यादी सर्व समस्यांतून आदिवासीना मुक्त करणेसाठी शिक्षण व ज्ञानाचा प्रसार करण्याची आवश्यकता आहे. त्यांना स्वच्छता व आरोग्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती करुन दिली पाहिजे. आदिवासींच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणात अंधश्रध्दा व काळी-पांढरी जादूचे आकर्षण असते. हे अंधश्रध्देचे जळमळाट दूर केले पाहिजे.आदिवासींचा विकास करण्यासाठी महाराष्ट्रात नागपूर ,अमरावती,नाशिक इत्यादी २९ ठिकाणीची कार्यालये आदिवासींच्या पुर्नवसन व विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करत आहेत.पण यातील प्रमुख अडचण म्हणजे अधिकारी वर्गाची काम करण्याची मानसिकता नाही. अनागोंदी कारभार,समयसुचकतेचा अभाव हे अवगुण आहे. उदाहरणार्थ आदिवासी विद्यार्थ्यांना हिवाळ्यात थंडी पासून बचाव करणेसाठी शासन स्वेटर खरेदी केली जाते पण त्याचे वाटप उन्हाळ्यात होते तेही निकृष्ट दर्जाचे.आदिवासी कल्याण योजनांचा लाभ खरच त्यांच्या पर्यंत पोहचतो का? मेळघाट सारख्या दुर्गम भागात शासन रोहयो कामाचा आदिवासी मजूरांना ३महिने झाले तरी मोबदला देत नाही.या हलगर्जीपणाला काय म्हणावे? ही त्यांची क्रुर चेष्टा नाही काय? डिजीटल इंडियाचा सध्या खूप गाजावाजा होत आहे. दरी खो-यात राहणाऱ्या दुर्गम भागात आदिवासी लोकांना शिक्षण,वीज,रोजगार इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे प्रथम काम आहे. जिथे एस.टी.महामंडळची बस पोहचू शकत नाही तिथे आम्ही ऑनलाइन नेटवर्क पोहचवणार आहोत. वीजेच अस्तित्व नसलेल्या गावात आमचे सरकार संगणक शिकवणार आहेत . वाह रे मेरे डिजीटल इंडिया. पण सरकार फक्त कागदोपञी व वर्तमानपत्र यामध्येच डिजीटल इंडियाला प्रसिद्धी देण्यात दंग आहेत.
आदिवासींना आधुनिक शेतीचे फार नाही किमान नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान व माहिती दिली तरी त्यांच्या आर्थिक प्रगतीला फुन न फुलाची पाकळी सारखा आधार लाभेल. हेमलकसाच्या धर्तीवर प्रत्येक आदिवासी क्षेत्रात आमटे सारखे नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांना सरकारने आर्थिक पाठबळ व तंत्रज्ञान मिळवून दिले पाहिजे. रेल्वे ट्रॕक टाकण्यासाठी सरकार जंगलात जाऊ शकते मग आदिवासींच्या विकासासाठी का नाही? नक्षलवाद संपविण्यापेक्षा त्यांच्या मनातील नक्षलवाद वाढविणा-या पध्दती वा गोष्टींचाना नष्ट केले तर अधिक छान होईल.मुळात आदिवासी माणूस म्हणून सन्मान द्या व प्रेमाने वागवा.जंगलातील झाडाची पाने नेसणा-या माणसाला शहरात नेऊन कापड बांधायला लावणे म्हणजे विकास नव्हे.मुल जन्माला आल्यावर लगेचच जिन्स घालत नाही.त्याला वाढवावे लागते नंतर शिकवावे लागते.अगदी आदिवासी बांधवाच असच आहे. तात्पर्य डिजीटल इंडिया आपल्यासाठी अभिमान व गौरवाची बाब असेल पण निसर्गा सोबत जुळलेल्या आदिवासी लोकांना निसर्गाच्या जडण घडणीतुनच साकारले पाहिजे.आधुनिकीकरणाचे जोखड त्यांच्यावर लादले तर ते आपल्या पासून दूरच जातील.मग काय भारत कधीच डिजीटल इंडिया होऊ शकणार नाही? म्हणूनच शहरवासीयां सोबत गाव व जंगलवासी आदिवासी यांनाही आपुलकीच्या व प्रेमाच्या चौकटीत घ्या.
यावर एक प्रकाश टाकण्यासाठी माझी स्वतःची केलेली कविता -मी आदिवासी रामासारखा वनवासी, द्रोणाचार्याची सत्ता तिथे अर्जुनाच्या हाती खलबत्ता,
एकलव्याची व्यथा गुरू असूनी माथी निर्रथकता, निःस्वार्थ आमच्या भाळी स्वार्थाने केली बळजबरी,
जिथे पानां फुलात सजलेले खोपटे काजव्यांनी दिपते, आधुनिक युगात मात्र प्रकाशासाठी तरसते,
मोह फुलांनी सण रंगले होते त्यानेच आम्हांस व्यसनी केले, याच समाजाचा मी, तरी फेकला गेलो दूर एका वेशीच्या कोप-यावरी, वाट पाहतो सावरायची अन् आधुनिक युगात वावरायची देईल का साथ कुणी मला विकासासाठीची
“धन्यवाद 🙏🙏🙏🙏