कोकणचे लोकनेते – राजाभाऊ लिमये,८७ व्या वर्षात पदार्पण

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार श्री. वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिमये येत्या २१ जुलै २०२२ रोजी ८७ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. शालेय शिक्षणानंतर प्रशासकीय सेवेत आयएएस अधिकारी बनण्याची मनिषा बाळगून शिक्षणासाठी मुंबईत गेलेला हा तरूण वडील व श्री. विष्णू माधव तथा बाळासाहेब लिमये यांच्या आजारपणामुळे सत्यशोधक परिवाराचा डोलारा सावरण्यासाठी काही दिवसात रत्नागिरीत परतला. लिमये कुटुंबाचा कॉंग्रेस पक्षाचा राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी उच्च शिक्षणाची महत्वाकांक्षा अपूर्णच राहिली आणि रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजात ज्युनियर बी. ए. पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर कौटुंबिक जबाबदार्‍यांबरोबरच साप्ताहिक आणि मुद्रणालयाची जबाबदारी शिरावर येवून पडली, त्यामुळे शिक्षण अर्धवटच सोडावे लागले.
राजाभाऊंचे पिताश्री बाळासाहेब लिमये यांनी १९४६-४७ च्या दरम्याने साप्ताहिक व मुद्रणालयाची मालकी लिमिटेड कंपनीत होती ती भागीदारांचे शेअर्सच्या रकमा देवून मालकी स्वतःकडे घेतली. राजाभाऊंच्या मातोश्री सौ. इंदिराबाई यांनी आपले सर्व दागिने विकून मालकी हक्क संपादन करण्यास मोलाचे साह्य केले. कर्जाचे ओझे डोक्यावर घेवून संस्था व कुटुंब जबाबदारीने चालविले.
बाळासाहेब लिमये कॉंग्र्रेस विचारांचे होते. त्या काळात कॉंग्रेस भवन स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरही ७-८ वर्षे नसल्याने इंदिराभवन हे कॉंग्रेस नेते आणि कॉंग्रेसच्या सभासदांसाठी सदैव उपलब्ध असे. त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांची सदैव ये-जा सातत्याने होत असे. पुढे ५६-५७ मध्ये कॉंग्रेसभवन अस्तित्वात आले तरीही सर्वश्री शामराव पेजे, प्रतापराव भोसले, हुसेन दलवाई असे जिल्ह्यातील सर्व नेते यांची सतत जा ये असे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात कॉंग्रेस पक्षाकडे कार्यकर्ते नव्हते. त्यावेळी शामराव पेजे आणि पिताजींच्या आग्रहामुळे कॉंग्रेसभवनात जावून बसण्याचे संकेत दिले गेले आणि तेव्हापासूनच राजाभाऊंनी कॉंग्रेस पक्ष कार्यात सक्रीय सहभाग घेण्यास सुरूवात केली.
१९६१ च्या मे महिन्यात राजाभाऊंच्या पिताश्रींचे निधन झाले आणि वडिलांच्या इच्छेप्रमाणे राजाभाऊ कुटुंबात मोठे नव्हते तरीसुद्धा कुटुंब आणि संस्था चालविण्याची जबाबदारी कोवळ्या वयातच पडली. वडिलांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे सोपविलेल्या जबाबदारीचे हे आव्हान डोक्यावर कर्जाचे ओझे असूनही स्विकारले आणि मोठ्या धडाडीने आणि संस्थेचे कर्जही फेडण्यास यशस्वी झाले. लिमये कुटुंबातील तीनही भगीनींचे विवाह कुठल्याही बंधूंकडून एक रुपयाचीही मदत न घेता स्वतः हिंमतीने करून दिले. भावांची शिक्षण, नोकर्‍या त्यांना मिळवून दिल्या आणि त्यांचे संसारही उभे करून दिले. १८७१ साली स्थापन झालेल्या सत्यशोधकची जबाबदारी जून १९६१ पासून स्विकारली ती पाच दशकांपेक्षा अधिक काळ मोठ्या जबाबदाीने स्विकारुन सर्व आर्थिक अडचणींवर मात करुन निष्ठेने पार पाडली.
राजाभाऊंनी पक्ष संघटनेबरोबरच रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपद पाच वर्षे सलग निस्वार्थीपणाने उत्कृष्ट कार्य केले. पाच वर्षात एकाही संघटनेकडून कसल्याही प्रकारची तक्रार वा संप, आंदोलनाची नोटीस दिली गेली नाही आणि उत्तम प्रशासकीय कार्यक्षम कारभारामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नांव महाराष्ट्रात झाले. तसेच केंद्रीय नारळ बोर्डावर २००४ च्या ऑक्टोबर महिन्यात त्यावेळचे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारसाहेब यांनी सदस्य म्हणून नियुक्ती केली. आणि जवळजवळ सलग दहा वर्षे या बोर्डावर त्यांनी केलेले कार्य सार्‍या महाराष्ट्राला परिचित झालेले आहे. दोन वेळा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, या संस्थेचे कोकण विभागीय समितीचे अध्यक्ष म्हणूनही आठ वर्षाहून अधिक काळ उत्तम कार्यरत होते. राष्ट्रीय नेते शरद पवारसाहेबांनी विश्वासाने टाकलेल्या जबाबदार्‍या उत्तम कार्याने सार्थ ठरविल्या. याशिवाय आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संस्थापक सदस्य व माजी संचालक अशा अनेक क्षेत्रात ते कार्यरत राहिलेले आहेत. त्याचबरोबर पत्रकारिता, मुद्रणसंस्था, रिक्षा व्यावसायिकांची संघटना, पदवीधर प्रा. शिक्षक संघटनेचे सल्लागार म्हणून जिल्हा व राज्यस्तरीय संघटनेचे कार्यात सहभागी होते. त्यांच्या सहाय्याने पदवीधर शिक्षक संघटनेतील ज्वलंत प्रश्‍न मार्गी लावण्यास यशस्वी झाले होते. अशा अनेक क्षेत्रात कार्यरत राहिल्याने त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा ठसा अनेक हितचिंतकांच्यात निर्माण झालेला आहे.
राजाभाऊंची पत्नी सौ. वसुधा यांच्या अकाली निधनानंतरही त्यांच्या चारही मुली आणि नातवंडे शैक्षणिक प्रगती करुन यशाच्या शिखरावर आहेत. त्यांची एक नात चि. शमिका भिडे तर गायनात आणि स्पर्धांत आघाडीवर आहे. हल्ली हल्लीतर रंगभूमी संगीत नाटकातील उत्तम संगीत गायिका म्हणून शासन पातळीवरील शासनाचे पुरस्कारही पटकावले आहेत.
कार्यकर्त्यांचे प्रेम असंख्य हितचिंतकांच्या सदिच्छा आणि थोरामोठ्यांचे आशिर्वाद सदैव राजाभाऊंच्या उराशी आहेत. मुली, जावई आणि नातवंडांकडूनही उदंड प्रेम जसे मिळत आहे तसेच त्यांचे धाकटे बंधू अशोकराव व सर्व भगिनी यांचेकडूनही उदंड प्रेम लाभत आहे. आज राजाभाऊ सार्वजनिक क्षेत्रातून निवृत्त झाले असले तरीही सर्वांशी सामंजस्य व एकोपा राखण्यात आपली हयात खर्च करीत आहेत. वयाची ८६ वर्षे पूर्ण करून ८७ व्या वर्षात पदार्पण करीत असताना आमच्या या लोकनेत्याला भावी आयुष्यात उत्तम आयुरारोग्य लाभो आणि ते शतायु होवोत अशी सदिच्छा व अभिष्टचिंतन वाढदिवशी करीत आहे.
-प्रभाकर कासेकर

निवृत्त माहिती अधिकारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button