
आंबेनळी घाट बुधवारी आठ तास राहणार वाहतुकीसाठी बंद; दुरूस्तीची कामे करणार
पोलादपूर : रायगड जिल्हा आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा सर्वात जुना आंबेनळी घाट बुधवार, दि. 4 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दिवसभरात दूरुस्तीकामांमुळे आठ तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाबळेश्वरचे सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता अ.श.देशपांडे यांनी दिली.
पोलादपूर ते महाबळेश्वरदरम्यान शिवकालीन डुक्करसोंडीचा घाट, त्यानंतरचा रडतोंडीचा घाट, ब्रिटीशकालीन फिटझगेराल्ड घाट आणि सद्यस्थितीत सर्वपरिचित आंबेनळी घाट असे नामांतर झालेल्या या रस्त्यावर 23 जुलै 2021 रोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे ठिकठिकाणी मोऱ्यांचे तसेच रस्त्याचे नुकसान झाले. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी प्रथम रायगड विभागाकडून एकेरी वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्यात आला आणि घाटरस्ता दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग महाबळेश्वरकडून सुरू राहिले. सद्यस्थिती पार फाट्यापासून महाबळेश्वरलगतच्या मेटतळे गावापर्यंतच्या घाटरस्त्यातील मोऱ्यांच्या कामात रस्ता फोडून काँक्रीटचे पाईप जमिनीमध्ये गाडण्याचे काम बुधवारी आठ तासात करण्यात येणार असून यामुळे पोलादपूर ते प्रतापगडपर्यंत वाहतूक सुरू राहणार असली तर पार फाट्यापासून महाबळेश्वरपर्यंत वाहतूक सुरू राहणार नसल्याने संपूर्ण आंबेनळी घाटातील वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता अधिकारी अ.श.देशपांडे यांनी सांगितले.
यासंदर्भात महाबळेश्वर पोलीस, महाड, श्रीवर्धन, मुंबई, रोहा, पुणे, सातारा येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून सुरू राहणारी एसटी बस प्रवासी वाहतूक बंद करण्यासंदर्भात पूर्वसूचना देण्यात आल्या असून उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग पोलादपूर तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता वाई तसेच वनक्षेत्रपाल वनविभाग महाबळेश्वर यांना महाबळेश्वर सार्वजनिक उपविभागीय अभियंता अधिकारी अ.श.देशपांडे यांनी दि.02-01-2023 रोजी शॉर्टटर्म नोटीसा बजावून बुधवारी आंबेनळी घाटातील वाहतूक बंद करण्यासंदर्भात कळविले आहे.