संगमेश्वर ते दापोली या एसटी बसमध्ये तीन महिलांनी चोरले अडीच लाखांचे दागिने
संगमेश्वर ते दापोली या एसटी बसमध्ये एका महिलेचे तीन अज्ञात महिलांनी तब्बल २ लाख ४० हजार किंमतीचे दागिने चोरल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. या चोरीप्रकरणी त्या तीन महिलांवर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी बहाद्दूरशेख नाका परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असुन यातून काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तविली आहे.याबाबतची फिर्याद संजना सचिन पाष्टे (आावाशी) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजना पाष्टे या त्याच्या मुलासह आवाशी येथे जाण्यासाठी सायंकाळी ६.३० वाजता शहरातील बहाद्दूरशेख नाका येथून संगमेश्वर ते दापोली या बसमध्ये चढल्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून ३ अनोळखी महिलाही चढल्या होत्या. असे असताना बस काही अंतरावर गेल्यावर त्या तीन महिलांनी बस वाहकाला आम्हाला रत्नागिरी येथे जायचे आहे. चुकून या बसमध्ये बसलो असे सांगून त्या बसमधून उतरल्या.त्याच दरम्यान प्रवासात असलेल्या पाष्टे यांनी तिकिटासाठीचे लागणारे पैसे काढण्यासाठी पर्सकडे पाहिले असता पर्सची चेन उघडी असल्याचा प्रकार लक्षात आला. त्यावेळी त्यांनी पर्स तपासली असता पर्समध्ये ठेवलेले २ लाख रुपये किंमतीचे ५ तोळ्याचे मंगळसूत्र, ४० हजार रुपये किंमतीचे नेकलेस असा २ लाख ४० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला. www.konkantoday.com