राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई शाश्वत विकास परिषदेचे उदघाटन संपन्न

मुंबईत ‘हॉर्न मुक्त’ सप्ताह साजरा करण्याची राज्यपालांची सूचना


जल प्रदूषण, वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण कमी करण्यात नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. मुंबईतील ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी ‘हॉर्न मुक्त आठवडा’ (नो हँकिंग वीक) साजरा करण्याबाबत पर्यावरण प्रेमी संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

अनेक देशात हॉर्नचा आवाज देखील ऐकू येत नाही. त्याउलट आपल्याकडे काही लोकांना विनाकारण हॉर्न वाजविण्याची वाईट सवय आहे. अनेकदा वाहनचालक सिग्नल सुरु होण्यापूर्वी विनाकारण हॉर्न वाजवतात. कर्कश हॉर्नमुळे लहान मुले व वृद्धांना होणाऱ्या त्रासाबद्दल देखील लोक असंवेदनशील होत असल्याबद्दल खेद व्यक्त करून ‘नो हाँकिंग’ सप्ताहामुळे ध्वनी प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल अशी आशा राज्यपालांनी व्यक्त केली.

राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. १५) यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे मुंबई शाश्वत विकास शिखर परिषदेचा उदघाटन सोहळा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. विवेकानंद युथ कनेक्ट फाऊंडेशनतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, हिंदुजा समुहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा, टाटा ट्रस्टचे मुख्य अधिकारी सिद्धार्थ शर्मा, विवेकानंद युथ कनेक्ट फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. राजेश सर्वज्ञ, पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.

शहरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी स्वयं शिस्त आवश्यक असल्याचे सांगून नागरिकांनी पातळ प्लास्टिक पिशव्याचा वापर कमी करावा तसेच गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळाव्या, असे राज्यपालांनी सांगितले.

सामाजिक व आर्थिक दृष्ट्या शेवटच्या स्तरावरील लोकांचा विकास होत नाही तोवर शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठता येणार नाही असे राज्यपालांनी सांगितले. मुंबईत पदपथांचा अभाव होत आहे तसेच वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे पार्किंगची समस्या वाढत आहे असे सांगून शहरी समस्यांच्या समाधानकारक निराकरणासाठी उपाययोजना झाल्या पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

दिल्लीतील पालिका बाजार प्रमाणे भूमिगत फेरीवाल्यांसाठी झोन व्हावे’

दिल्लीतील पालिका बाजार प्रमाणे मुंबईत देखील फेरीवाल्यांसाठी भूमिगत बाजारपेठेसाठी नियोजन व्हावे अशी अपेक्षा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. नदी व जलस्रोतांमध्ये कचरा व सांडपाणी टाकणे बंद झाले पाहिजे असे सांगून शहरांमध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, युवक अश्या सर्व वयोगटातील लोकांसाठी स्वतंत्र जागा असल्या पाहिजे असे त्यांनी सांगितले. भारत जगातील युवा देश असून कौशल्य शिक्षण तसेच इंग्रजीसह जर्मन, फ्रेंच आदी भाषा शिकल्यास युवकांना विविध देशात नोकऱ्या मिळवून जग जिंकता येईल असे त्यांनी सांगितले.

अशोक हिंदुजा

टोकियो हे मुंबई प्रमाणेच मोठ्या लोकसंख्येचे शहर आहे. मात्र तेथे सार्वजनिक दळणवळण व्यवस्था उत्तम असल्यामुळे प्रदूषण कमी आहे. दोन कोटी लोकसंख्येच्या मुंबई सारख्या शहराच्या विकासाचे नियोजन करताना लोकसंख्या काही वर्षांनी दुप्पट होईल हे गृहीत धरून केले पाहिजे असे अशोक हिंदुजा यांनी सांगितले. मुंबई हे लंडन प्रमाणे डबल डेकर बसेसचे शहर झाल्यास त्याने अधिक लोकांची प्रवासाची सोय होईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते पर्यावरण, संस्कृती व समाजसेवा क्षेत्रातील ‘मुंबई सस्टेनेबिलिटी’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. सेवानिवृत्त प्रशासकीय अध‍िकारी राधेश्याम मोपलवार यांना ‘मुंबई शाश्वत विकास जीवन गौरव’ पुरस्कार देण्यात आला. डॉ दिवेश मिश्रा (पर्यावरण), अनुराधा पाल (स्त्री शक्ती महिला शास्त्रीय वाद्यवृंद), डॉ. हरिष शेटटी (आहार वेद) , अमृत देशमुख (स्वयं वाचन चळवळ) , सुजाता रायकर (साथ), लॉरेन्स बिंग (हॉकी), डॉ चिनु क्वात्रा (खुश‍िया फाऊंडेशन) यांना देखील राज्यपालांच्या हस्ते ‘मुंबई सस्टेनेबिलिटी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button