
शपथेचा मजकूर काळजीपूर्वक वाचलेला दिसत नाही: नितेश राणेंच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावर रोहित पवारांचा टोला.
मत्सउद्योग मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांना निधी मिळणार… मविआच्या सरपंचांना निधी मिळणार नाही, कारण आपला बॉस वरती खंबीर बसलाय, असे वादग्रस्त विधान नितेश राणे यांनी केले आहे.गावाचा विकास करायचा असेल, तर भाजपमध्ये प्रवेश करा असं खुलं आव्हान त्यांनी यावेळी बोलताना केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या या विधानावर आता शरद पवार गटाचे रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
जिल्हा नियोजनचा निधी किंवा कुठलाही निधी केवळ महायुतीच्या कार्यकर्त्यांनाच भेटेल बाकी कोणालाही भेटणार नाही, जिथे जिथे विरोधी पक्षाचे सरपंच असतील त्या गावाला एक रुपयाही देणार नाही, ज्यांना निधी हवा असेल त्यांनी पक्षप्रवेश करावा, ही मंत्रीमहोदयांची भाषा बघता, त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेताना शपथेचा मजकूर काळजीपूर्वक वाचलेला दिसत नाही, अथवा त्यांना संवैधानिक शपथेचा विसर पडलेला दिसतो, असा टोला नितेश राणेंच्या विधानावर रोहित पवारांना लगावला आहे.
मंत्रीच अशा प्रकारे संविधानाची चिरफाड करणार असतील तर संविधान टीकेला का? असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. मंत्री महोदयांनी संवैधानिक जबाबदारी समजून घेत मंत्र्यांसारखे वागायला हवे. मुख्यमंत्री महोदय आपल्या मंत्र्यांना समाज देतील, ही अपेक्षा! अशी पोस्ट रोहित पवार यांनी त्यांच्या एक्सवरील अकाउंटवरून शेअर केली आहे. तसेच या पोस्टसोबत नितेश राणे यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.