म्हाडाच्या कोकण मंडळाने 5 हजार 309 घरांसाठी लॉटरी काढलीय…ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथे सदनिका

0
45

मुंबई जवळ घर घेणा-यांसाठी म्हाडाच्या कोकण मंडळाने 5 हजार 309 घरांसाठी लॉटरी काढलीय… आज पासून अर्जविक्रीला सुरूवात होणार आहे. या लॉटरीची नोव्हेंबरमध्ये सोडत निघणार आहे.मे महिन्यात म्हाडाने 4 हजार 654 घरांसाठी सोडत काढली होती. मात्र, सोडतीतील अनेक घरं विकली नाहीत. तसंच प्रथम येणा-यांना प्राधान्य आणि म्हाडा योजनेतील घरांना अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शिल्लक घरांसह म्हाडाच्या विविध गृहनिर्माण योजनेतून उपलब्ध झालेल्या घरांसाठी सोडत आहे
म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या 5311 सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा “गो लाईव्ह” कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते 15 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. कोंकण मंडळाच्या सोडतीमध्ये 1010 सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेतील आहेत.
7 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयाच्या प्रांगणात प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. IHLMS 2.0 या नूतन संगणकीय प्रणाली व ॲपच्या सहाय्याने सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजेपासून सुरुवात होणार आहे. नवीन आज्ञावली नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरणार आहे कारण अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊशकतात. नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून सहजरित्या उपलब्ध होणार आहेत. सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios)या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिम वर उपलब्ध आहे. ॲण्ड्रोइड व्हर्जनच्या मोबाईलमध्ये गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोअरमध्ये Mhada Housing Lottery System या नावे मोबाइल ॲप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनीचित्रफिती आणि हेल्प फाईल या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी केले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here