जाहिरातीवरून वाद रंगला, सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर बच्चू कडूंचं अनोखे आंदोलन
सचिन तेंडुलकर यांनी केलेल्या ऑनलाईन गेमिंग च्या जाहिरातीवरून आता वाद निर्माण झाला असूनमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविरोधात प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू व त्यांचे कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत. बच्चू कडूंनी सचिन तेंडुलकरकडे भारतरत्न पुरस्कार परत करण्याची मागणी केली आहे.
तेंडुलकर यांनी ही जाहिरात सोडावी यासाठी ३० ऑगस्टपर्यंतची मुदत त्यांनी दिली होती. मात्र, तोपर्यंत सचिन तेंडुलकरकडून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे आता बच्चू कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज सकाळी सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांसह बच्चू कडू स्वत: आंदोलनात सहभागी झाले होते. तसेच, आता सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं आहे.
बच्चू कडूंनी काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरने केलेल्या एका जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. ऑनलाईन गेमिंगच्या या जाहिरातीमुळे सचिन तेंडुलकरला मानणाऱ्या तरुणाईवर परिणाम होत असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकरनं एकतर या जाहिराती सोडाव्यात किंवा त्याला देण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार तरी त्यानं परत करावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. . या आंदोलकांमध्ये पोलिसांनी मध्यस्थी करत बच्चू कडू व काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
दरम्यान, बच्चू कडूंनी आपल्या मागणीसाठी सर्व गणेश मंडळांच्या मंडपांबाहेर ‘सचिन तेंडुलकर दानपेटी’ ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तेंडुलकर यांनी जर ही जाहिरात सोडली नाही, तर आम्ही प्रत्येक गणपती मंडळासमोर दानपेटी ठेवणार आहोत.
दानपेटीत जमा होणारा सर्व पैसा गणेश विसर्जनाच्या दिवशी सचिन तेंडुलकरला आणून देणार असल्याचंही बच्चू कडू यांनी यावेळी जाहीर केलंअसं बच्चू कडू यांनी नमूद केलं.
www.konkantoday.com