२०१८ पासून स्वयचलित वाहनांच्या प्रलंबित यादीची पूर्तता करा


रत्नागिरी : शासनाच्या ५ टक्के दिव्यांग निधीतून २०१८ पासून शिल्लक राहिलेल्या स्वयंचलित तीन चाकी सायकलची (साईड व्हीलसह स्कूटर) यादी प्रलंबित आहे. त्याकरिता तत्काळ निधी देऊन वाहने दिव्यांग बांधवांना द्यावी, अशी मागणी आज जिल्हा एकता दिव्यांग ग्रुपने केली. १५ दिव्यांग बंधू-भगिनींनी आज जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह पालकमंत्री यांच्या कार्यालयात निवेदन सादर केले.

हे निवेदन देण्यासाठी संगमेश्वरमधून शांताराम लाड, अमित देसाई, दीपक जाधव, रवींद्र कुळ्ये, चिपळुणमधून आतिष सकपाळ, खेडचे चंद्रकांत आंब्रे, महेश भोसले, राजापूरचे सनिफ हातवडकर, सदाकत घालवेलकर, तबरेज भाटकर, अंकिता गांधी, रमेश डोंगरकर, संतोष धरणकर, अनंत गांधी, मंडणगडचे रुपेश पवार, दापोलीतील वासुदेव चौगुले आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, सर्व दिव्यांगांनी २०१८ पासून स्वयंचलित तीन चाकी सायकल (साईड व्हीलसह स्कूटर) साठी अर्ज केले होते. मात्र त्यातील ५० टक्के दिव्यांगांना गाडीसाठी निधी मिळाला. त्यातही काही नवीन आलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिले गेले. या निधीचे समान वाटप न झाल्यामुळे रत्नागिरी तालुक्याला जास्त निधी व अन्य तालुक्यांना कमी निधी मिळाला आहे.

आताच्या ५ टक्के दिव्यांग निधीमध्ये आम्ही व अन्य ५० टक्के दिव्यांग शिल्लक राहिले हेत. त्यांना त्यांच्या क्रमवारीप्रमाणेच निधी वाटप केला जावा. प्रथम यादीतील नावे पूर्ण झाल्यानंतर नवीन नावांचा विचार करावा. दिव्यांगांची शिल्लक राहिलेली यादीची लवकरात लवकर पूर्तता करून त्यासाठी निधी वितरित केला जावा, अशी मागणी केली आहे. दिव्यांगासाठी देण्यासाठी निधी नसेल तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तेवढा निधी निधीतून उपलब्ध करण्यास सांगून किंवा इतर कोणताही निधी यासाठी उपलब्ध करून दिव्यांगांची शिल्लक राहिलेल्या यादीची लवकरात लवकर पूर्तता करावी, अशी मागणीही या दिव्यांगांनी केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button