
लघवीला जातो असे सांगत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला सराईत चोरटा
रत्नागिरी : लघवीला जाऊन येतो, असे सांगत रेल्वे गाड्यांमध्ये चोर्या करणारा सराईत चोरटा रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला. दत्तात्रय शिवाजी गोडसे (राहणार सोलापूर) असे या चोरट्याचे नाव असून ही घटना ही घटना शनिवारी घडली. कोकण रेल्वेत चोर्या करणार्या या चोरट्याला यापूर्वी शहर पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर सुटल्यावर तो पुन्हा कोकण रेल्वेत चोर्या करू लागला. रेल्वे पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास या चोरट्याला अटक केली. त्यानंतर त्याला रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. चोरट्याच्या हातात बेडी घालून त्याला बंद खोलीत बसवून ठेवण्यात आले होते. लघवीला जातो असे त्याने सांगितल्यानंतर रेल्वे पोलिस त्याला बाथरूमला घेऊन गेले. यावेळी त्याने जोरात हात ओढत बांधावरून उडी मारून तेथून पळ काढला. शहर पोलिसांनी तत्काळ शहरात नाकाबंदी करून चोरट्याचा शोध सुरू केला आहे.