रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलमध्ये भरला ‘आनंद बाजार’; विद्यार्थीच बनले विक्रेते आणि ग्राहक
रत्नागिरी : कुणी भाजीपाला विक्रीसाठी आणला, तर कुणी खाद्यपदार्थ बनवून विकले… कुणी कोकणी मेवा तर कुणी चक्क माशांसह येथील वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ, वस्तू विक्रीसाठी मांडल्या होत्या. विक्रेतेही विद्यार्थी आणि ग्राहकही विद्यार्थीच! अगदी इमिटेशन ज्वेलरीपासून जीवनावश्यक असणाऱ्या अनेक वस्तू विद्यार्थ्यांनी स्टॉलमध्ये मांडल्या आणि खरेदी-विक्रीच्या उत्साहाचा ‘आनंद बाजार’ रंगला तो रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलमध्ये.
विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी या विद्यार्थ्यांच्या स्टॉलवरील वस्तू खरेदी केल्या आणि या स्टॉलवाल्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.
रत्नागिरी शहरातील फाटक हायस्कूलमध्ये स्वस्त आणि मस्त आनंद बाजार हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक किशोर लेले, उपमुख्याध्यापक पाटणकर सर, पर्यवेक्षक झोरे सर व सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत झाले. विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर व्यावहारिक ज्ञान प्रत्यक्ष अनुभवता यावे, नफा-तोटा सारख्या गणिती संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, स्व कमाई व स्वयंरोजगार याचे संस्कार व्हावेत, श्रमाचे महत्त्व शालेय वयातच कळावे, कष्ट करण्याची तयारी शालेय वयातच निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे हे 7 वे वर्ष असल्याची माहिती शिक्षक प्रकाश देवरुखकर यांनी यावेळी उपस्थितांना दिली. सुमारे 120 ते 150 विद्यार्थ्यांनी यावेळी स्टॉल लावले होते. कोकणची खास ओळख असणारे खाद्यपदार्थ, कोकणातील पिकांपासून बनलेली पीठे, विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले अन्नपदार्थ, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू या आनंद बाजारात लक्षवेधी ठरल्या. या आनंद बाजारातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी यावेळी दिल्या. पालकांनीही हे स्टॉल लावण्यासाठी मेहनत घेतली. त्यांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेत या उपक्रमाचे कौतुक केले. शाळेतील शिक्षकांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.